चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. रविवारी (दि. 14 मे) पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता संघाने चेन्नईला 6 विकेट्सने पराभूत केले. कोलकाताच्या या विजयात कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांचा मोलाचा वाटा राहिला. या विजयासह कोलकाता संघाने हंगामातील सहावा विजय खिशात घातला. दुसरीकडे, चेन्नई संघाने हंगामातील 5वा पराभव पत्करला. चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 144 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाने 18.3 षटकात 147 धावा केल्या. त्यामुळे कोलकाताने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.
कोलकाताच्या डावात त्यांची खराब सुरुवात झाली. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आधी 1 धावेवर तंबूत परतला. त्याच्यानंतर जेसन रॉय (12) आणि वेंकटेश अय्यर (9) यांनीही झटपट आपल्या विकेट्स गमावल्या. मात्र, नंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या नितीश राणा आणि रिंकू सिंग (Nitish Rana And Rinku Singh) यांनी संघाचा डाव सांभाळला. यावेळी त्यांच्यात 99 धावांची भागीदारी झाली. रिंकूने 43 चेंडूत 54 धावा करत अर्धशतक साकारले. यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. तसेच, राणाने 44 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या. तसेच, आंद्रे रसेल 2 धावा करून नाबाद राहिला.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना दीपक चाहर याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 3 षटके गोलंदाजी करताना 27 धावा खर्च करत 3 विकेट्स नावावर केल्या.
चेन्नईसाठी दुबेची शानदार खेळी व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून शिवम दुबे (Shivam Dube) याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. दुबेने 34 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त डेवॉन कॉनवे याने 30 धावा केल्या. तसेच, रवींद्र जडेजा यानेही 20 धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. ऋतुराज गायकवाड (17) आणि अजिंक्य रहाणे (16) यांनी दोन आकडी धावसंख्या केली. त्यांच्याव्यतिरिक्त अंबाती रायुडू 4, तर मोईन अली 1 धावेवर बाद झाले. तसेच, एमएस धोनी (MS Dhoni) 2 धावांवर नाबाद राहिला.
यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये नारायणने फायदेशीर गोलंदाजी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना फक्त 15 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
विराटकडून युवा जयसवालला गुरुमंत्र! सामन्यानंतर खास टिप्स देताना दिसला ‘किंग’, पाहा व्हिडिओ
हा तर RCBचा धोनी! भावाने स्टंप्सकडे न पाहताच अश्विनला केले यष्टीचीत, ‘नो लूक’ Runout व्हिडिओ व्हायरल