श्रीलंका संघाचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला फिरकी गोलंदाजीतील दिग्गज मानले जाते. मुरलीधरन आणि शेन वॉर्न हे क्रिकेट इतिहासातील महान फिरकीपटू गोलंदाज आहेत. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ८०० विकेट्स आपल्या नावावर केले आहेत.
या लेखात आपण मुरलीधरनच्या शेवटच्या कसोटी सामन्याबद्दल आढावा घेणार आहोत, ज्यामध्ये त्याला स्वत:च्या क्षमतेवर किती जास्त विश्वास होता आणि सर्वात चांगल्या विरोधी संघाविरुद्ध त्याने कशी चांगली कामगिरी केली होती.
श्रीलंकेचा संघ २०१० मध्ये भारताविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे यजमानपद सांभाळत होता. त्यावेळी मुरलीधरनने निर्णय घेतला होता की, त्याला पहिल्या कसोटी सामन्यानंतर आपल्या निवृत्तीची घोषणा करायची आहे.
७९२ विकेट्सवरच केली होती घोषणा- पुढचा कसोटी सामना असेल शेवटचा
त्यावेळी मुरलीधरनला ८०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी केवळ ८ विकेट्सची आवश्यकता होती. तसेच भारतीय संघाविरुद्ध ८ विकेट्स घेणे तेसुद्धा एकाच कसोटी सामन्यात, हा खूप कठीण प्रश्न होता. भारतीय संघ नेहमीच फिरकीपटूंविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. परंतु मुरलीधररने आधीच घोषणा केली होती की, तो त्या सामन्यात ८ विकेट्स घेणार आहे.
“तो ८०० विकेट्स पूर्ण करण्यापासून केवळ ८ विकेट्स दूर होता. जसे आपणा सर्वांना माहित आहे की, हा अविश्वसनीय आकडा आहे. तो म्हणाला होता की, त्याला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवृत्ती घ्यायची होती आणि त्यावेळी मी कर्णधार होतो. मी निवडकर्त्यांशी चर्चा केली आणि म्हणालो, त्याला १ कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घ्यायची आहे,” असे भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनशी (R Ashwin) बोलताना कुमार संगकारा (Kumar Sangakkara) म्हणाला.
संगकाराने मुरलीधरनला समजावण्याचा केला प्रयत्न-
“आम्ही त्याला ८ विकेट्स घेऊन निवृत्ती घेण्यासाठी तयार केले. त्यामुळे आम्ही मुरलीधरनला एका बैठकीत बोलावले. मी म्हणालो, आम्हाला माहित आहे, की तुला आव्हानांना सामोरे जाणे आवडते. परंतु अशाप्रकारे विचार कर. ही खूप दु:खद गोष्ट असेल, की तू इतक्या जवळ येतो आणि तुला ८०० विकेट्सही पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे तू १ कसोटी सामना खेळू शकतो आणि त्यानंतर जर तुला थकवा जाणवला, तर विश्रांती घेऊन पुन्हा तिसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करशील. तसेच तू २ कसोटी सामन्यांतून सुट्टी घेऊ शकतो आणि पुढच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो,” असे मुरलीधरनबद्दल बोलताना संगकारा म्हणाला.
“मुरलीने आमच्याकडे पाहिले आणि म्हणाला, की ही पद्धत कोणाच्याही कामी येणार नाही. मी नेहमी आव्हानांशी प्रेम केले आहे. जर मला सर्वोत्तम फिरकीपटू समजले, तर मला कोणत्याही संघाविरुद्ध ८ विकेट्स घेण्यास सक्षम असले पाहिजे,” असेही संगकारा पुढे म्हणाला.
‘तुमचे खूप-खूप आभार, मी ८ विकेट्स घेण्यास चाललो आहे’-
मुरलीधरन म्हणाला, “जर मी ८ विकेट्स घेतल्या, तर मी केवळ आपल्या ८०० विकेट्सच पूर्ण करणार नसून आपल्या संघाला हा कसोटी सामनाही जिंकून देण्यास चाललो आहे. मी ही कामगिरी जर करू शकलो नाही, तर मी आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही. तसेच हा माझा शेवटचा कसोटी सामना आहे. तुमचे खूप-खूप आभार. मी ८ विकेट्स घेण्यास जात आहे.”
मुरलीधरनचे हे विधानाला उजाळा देत संगकारा पुढे म्हणाला की, “तेव्हा मी बसलो होतो आणि विचार करत होतो, की तो किती महान व्यकी आहे.”
मुरलीधरनने जे म्हटले होते ते करून दाखविले. त्याने भारताविरुद्ध पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेत विश्वविक्रम रचला. श्रीलंका संघाने तो सामना १० विकेट्सने आपल्या नावावर केला. तसेच मुरलीधरनवर मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा वर्षाव झाला.
मुरलीधरनने कसोटी इतिहासात सर्वाधिक ८०० विकेट्स घेणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. हा असा विक्रम आहे, जो कदाचित इथून पुढेही अबाधित राहील.
वाचनीय लेख-
-३ अशा घटना ज्यामध्ये दादाने दाखवून दिले होते की, तोच आहे खरा बॉस
-टीम इंडियासाठी दिवस रात्र घाम गाळणाऱ्या ‘या’ ३ खेळाडूंना विश्वचषकात मिळाली नाही संधी