रविवारी(७ फेब्रुवारी) वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशला चटगांव येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान वेस्ट इंडिजने ५ वा दिवस संपण्याआधी पूर्ण करत सामना जिंकला. या विजयात वेस्ट इंडिजच्या पदार्पणवीर काईल मेयरने सर्वाधिक मोलाचा वाटा उचलला. त्याने द्विशतकी खेळी करत आपले पदार्पण ऐतिहासिक केले. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
बांगलादेशने दिलेल्या ३९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मेयरने सामन्याच्या चौथ्या डावात ३१० चेंडूत २० चौकार आणि ७ षटकारासह नाबाद २१० धावांची खेळी केली. या खेळीसह तो पदार्पणाच्या कसोटी सामन्यात चौथ्या डावात द्विशतकी खेळी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने यासह अनेक विक्रमांना गवसणी घातली, त्याचा घेतलेला हा आढावा.
-कसोटी पदार्पणात द्विशतकी खेळी करणारा ६ वा फलंदाज
पदार्पणाच्या कसोटीत द्विशतकी खेळी करणारा मेयर हा एकूण सहावा फलंदाज आहे. त्याच्याआधी टीप फोस्टर, लॉरेन्स रोव, ब्रेंडन कुरुप्पू, मॅथ्यू सिन्केर, जॅक रुडॉल्फ यांनी असा कारनामा केला होता. पण असे असले तरी यांच्यातील एकानेही सामन्याच्या चौथ्या डावात द्विशतक केलेले नाही. त्यामुळे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात चौथ्या डावात द्विशतक करणारा मेयर पहिलाच फलंदाज आहे.
कसोटी पदार्पणात द्विशतकी खेळी करणारे फलंदाज –
२८७ धावा – टिप फोस्टर (विरुद्ध ऑस्ट्रेलिया,१९०३)
२१४ धावा – लॉरेन्स रोव (विरुद्ध न्यूझीलंड १९७२)
२०१ धावा* – ब्रेंडन कुरुप्पू (विरुद्ध न्यूझीलंड, १९८७)
२१४ धावा – मॅथ्यू सिन्केर (विरुद्ध, वेस्ट इंडिज, १९९९)
२२२ धावा* – जॅक रुडोल्फ (विरुद्ध बांगलादेश, २००३)
२१० धावा* – काईल मेयर (विरुद्ध बांगलादेश, २०२१)
-पदार्पणाच्या कसोटीत चौथ्या डावात सर्वोच्च धावा –
मेयरने पदार्पणाच्या चौथ्या डावात द्विशतक करत विश्वविक्रम केलाच आहे. त्यामुळे तो पदार्पणाच्या कसोटीत चौथ्या डावात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाराही फलंदाज ठरला आहे. त्याने ६२ वर्षांपूर्वीचा अब्बास बेग यांचा विक्रम मोडला आहे. अब्बास बेग यांनी त्यांच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या डावात ११२ धावांची खेळी केली होती.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात चौथ्या डावात सर्वोच्च वैयक्तिक धावा –
२१० धावा* – काईल मेयर, २०२१
११२ धावा – अब्बास बेग, १९५९
११० धावा* – फाफ डू प्लेसिस, २०१२
१०९ धावा* – मोहम्मद वासिम, १९९६
-कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात द्विशतक करणारा ६ वा फलंदाज –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्यातील चौथ्या डावात द्विशतक करणारा मेयर सहावाच फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी जॉर्ज हेडली, बिल एड्रीच, सुनील गावसकर, गोर्डन ग्रिनिज आणि नॅथन ऍस्टल यांनी हा विक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात द्विशतक करणारे फलंदाज –
२२३ – जॉर्ज हेडली (विरुद्ध इंग्लंड, १९३०)
२१९ – बिल एड्रीच (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १९३९)
२२१ – सुनील गावसकर (विरुद्ध इंग्लंड, १९७९)
२१४* – गोर्डन ग्रिनिज (विरुद्ध इंग्लंड, १९८४)
२२२ – नॅथन ऍस्टल (विरुद्ध इंग्लंड, २००२)
२१०* – काईल मेयर (विरुद्ध बांगलादेश, २०२१)
महत्त्वाच्या बातम्या –
शतक आणि पंतच थोडसं वाकडचं! आजवर चक्क चार वेळा झालाय ९०-९९ धावांवर बाद
शतक आणि पंतच थोडसं वाकडचं! आजवर चक्क चार वेळा झालाय ९०-९९ धावांवर बाद
भारतीय गोलंदाजांचे पाऊल पडते पुढे! ‘इतके’ नोबॉल टाकत केला नकोसा विक्रम