न्यूझीलंड संघाने टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील पहिला सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) सिडनी येथे पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 89 धावांनी विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने विश्वचषकात विजयी सुरुवात केली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम रचला गेला. त्यांना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या फरकाने सामना गमवावा लागला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 200 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला 201 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 17.1 षटकात 111 धावांवरच संपुष्टात आला. त्यांना 89 धावांनी पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये मोठ्या फरकाने पराभूत झाला.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ 2005 साली इंग्लंडविरुद्ध साऊथम्पटन येथे खेळताना सर्वप्रथम 100 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला होता. त्यानंतर 2012 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कोलंबो येथे 74 धावांच्या फरकाने ऑस्ट्रेलिया संघ पराभूत झाला होता. पुढे 2014 साली भारताविरुद्ध मीरपूर येथे खेळताना ऑस्ट्रेलिया संघ 73 धावांच्या फरकाने पराभूत झाला होता. त्यानंतर 2018 साली पाकिस्तानविरुद्ध अबू धाबी येथे खेळताना ऑस्ट्रेलिया संघाला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघ न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सर्वाधिक मोठ्या फरकाने पराभूत झाला.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा मोठ्या फरकाने पराभव
100 धावा, विरुद्ध- इंग्लंड, साऊथम्पटन (2005)
89 धावा, विरुद्ध- न्यूझीलंड, सिडनी (2022)*
74 धावा, विरुद्ध- वेस्ट इंडिज, कोलंबो (2012)
73 धावा, विरुद्ध- भारत, मीरपूर (2014)
66 धावा, विरुद्ध- पाकिस्तान,अबू धाबी (2018)
ऑस्ट्रेलिया सामन्याचा आढावा
या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल (28), पॅट कमिन्स (21), मिचेल मार्श (16), आणि कर्णधार ऍरॉन फिंच (13) यांना 30 धावाही करता आल्या नाहीत. संघाची फलंदाजी फळी नियमित अंतराने ढासळल्याने सुपर 12मधील पहिल्याच सामन्यात संघाला पराभवाचा धक्का बसला.
यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मिचेल सँटनर आणि टीम साऊदी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यांच्याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट याने 2 विकेट्स घेतल्या, तर लॉकी फर्ग्युसन आणि इश सोधी यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! न्यूझीलंडच्या पठ्ठ्याने चित्त्याच्या चपळाईने झेल घेत स्टॉयनिसला धाडलं तंबूत, व्हिडिओ पाहिला का?
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध