जगभरातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये भारताचा माजी खेळाडू एमएस धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. धोनीने भारताला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, पण असे असले तरीही तो इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत अजूनही सक्रिय आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. स्पर्धेतील 24वा सामना सोमवारी (दि. 17 एप्रिल) बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी एमएस धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, “त्याच्यासारखा कर्णधार ना कधी झालाय, ना कधी भविष्यात होईल.”
काय म्हणाले गावसकर?
माजी भारतीय कर्णधार गावसकर म्हणाले की, “संकटाच्या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे, हे चेन्नई सुपर किंग्स संघाला माहिती आहे. हे फक्त एमएस धोनीच्या नेतृत्वानेच शक्य होऊ शकले आहे. 200 सामन्यात नेतृत्व करणे खूपच कठीण आहे. इतक्या सामन्यात नेतृत्व करणे ओझे आहे आणि त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो.”
एमएस धोनीचा विक्रम
खरं तर, एमएस धोनीने 12 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरून सीएसकेसाठी 200 सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम केला होता. 41 वर्षीय धोनी हा विक्रम करणारा आतापर्यंतच्या इतिहासातील पहिला खेळाडू आहे. धोनी भारतीय संघ आणि आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार आहे. त्याने सीएसकेला आतापर्यंत आयपीएलच्या 4 ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत.
धोनीची क्रिकेट कारकीर्द
धोनीने भारतीय संघाला 2007चा टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. त्याने त्याच्या कारकीर्दीत 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 4876 धावा, वनडेत 10773 धावा आणि टी20त 1617 धावा केल्या आहेत. धोनीने वनडेत एक विकेटही घेतली आहे. दुसरीकडे, आयपीएलविषयी बोलायचं झालं, तर त्याने 238 सामन्यात 5036 धावा केल्या आहेत. (legend sunil gavaskar said there has never been captain like ms dhoni and will never happen in future)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो पण 360 डिग्री खेळाडू…’, वेंकटेशने वादळी शतक ठोकताच इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे मोठे विधान
‘माझं नाव सिमरन…’, विजयानंतर ड्रेसिंग रूममध्येही चमकला हेटमायर; मजा-मस्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल