तीन सामन्यांच्या टी२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने यजमान इंग्लंडला ३१ धावांनी पराभूत केले. या विजयासह बाबर आझमच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाचा फलंदाज लियाम लिव्हींगस्टोन याने एकट्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करताना एक झंझावाती शतक झळकावले.
लिव्हींगस्टोन संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही परंतु, आपल्या स्फोटक खेळीमुळे चाहत्यांची मने जिंकण्यात तो नक्कीच यशस्वी ठरला. त्याचवेळी त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. लियाम लिव्हींगस्टोनने ४३ चेंडूंत ६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची शानदार खेळी साकारली.
लिव्हींगस्टोनने लावली विक्रमांची रास
लिव्हींगस्टोनने अवघ्या ४२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा झाला आहे. याच डावामध्ये लिव्हींगस्टोनने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून इंग्लंडसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले होते.
लिव्हींगस्टोनने त्याच्या खेळीत नऊ षटकार ठोकले जो इंग्लंडसाठी एक विक्रम आहे. इंग्लंडकडून एका टी२० डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत ओएन मॉर्गन, जेसन रॉय आणि रवी बोपारा यापूर्वी पहिल्या क्रमांकावर होते. या सर्वांनी इंग्लंडकडून डावात सात षटकार लगावले होते. मात्र, आता लिव्हींगस्टोन या सर्वांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाकिस्तानच्या वर्चस्वाला पोहोचला धक्का
दुसरीकडे, टी२० स्वरूपात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा लिव्हींगस्टोन पहिला खेळाडू आहे. पाकिस्तानच्या पुरुष संघाने आतापर्यंत १७१ सामने तर महिला संघाने १२३ सामने खेळले आहेत. मात्र, त्यांच्याविरूद्ध आत्तापर्यंत कोणत्याही संघातील कोणत्याही खेळाडूने शतकी खेळी केली नव्हती. आता हा मान देखील लिव्हींगस्टोनकडे गेला.
टी२० विश्वचषकात दिसू शकतो लिव्हींगस्टोन
पाकिस्तानविरुद्धच्या तुफानी शतकानंतर लियाम लिव्हींगस्टोन ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकात त्याला इंग्लंड संघात संधी मिळू शकते. तो सलामीवीर मधल्या फळीतील फलंदाज तसेच फिनिशर अशा तिहेरी भूमिका संघासाठी निभावू शकतो. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतो.
महत्त्वाच्या बातम्या-
चित्यासारखी चपळता.. हवेत सुरेख डाईव्ह.. ब्राउंडीवर फॅबियन ऍलेनचा अविश्वसनीय झेल; एकदा पाहाच
टी२०त ९ वर्षांपासून भारताला पराभूत करू शकला नाही पाकिस्तान, विश्वचषकात ‘अशी’ राहिलीय कामगिरी
राहुल-अथियाच्या नात्यावर सुनिल शेट्टींनी सोडले मौन; म्हणे, ‘हे जोडपं एकमेकांना शोभून दिसतं’