टी२० क्रिकेट, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचे सर्वात छोटे स्वरुप आहे. त्यामुळे फलंदाज एक-दोन धावा न काढता अधिकाधिक चेंडू सीमारेषेपार पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतात. ख्रिस गेल, रोहित शर्मा, मार्टिन गप्टिल, एबी डिविलियर्स यांना त्यांच्या विस्फोटक फलंदाजी शैलीमुळे टी२० क्रिकेटचा स्पेशलिस्ट म्हटले जाते. आता याच रांगेत वेस्ट इंडिजचा २९ वर्षीय सलामीवीर एविन लुईसचे नाव जोडले जाणार आहे. नुकतेच त्याने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत टी२०तील मोठा विक्रम मोडला आहे.
शुक्रवार रोजी (१६ जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेंट लूसिया येथे पाचवा आणि अंतिम टी२० सामना झाला. यजमान वेस्ट इंडिजने १६ धावांनी हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला टी२० मालिकेत ४-१ ने पराभूत केले. वेस्ट इंडिजच्या या विजयात सलामीवीर लुईसचा मोलाचा वाटा राहिला. त्याने २३२ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत अवघ्या ३४ चेंडूत ७९ धावांची झंझावती खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ९ खणखणीत षटकार ठोकले.
या ९ षटकारांसह त्याने आपले टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० षटकार पूर्ण केले आहेत. कौतुकास्पद बाब अशी की, केवळ ४२ डावात त्याने ही कामगिरी केली आहे. यासह टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १०० षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. यापुर्वी २०१७ मध्ये ४९ टी२० डावात १०० षटकार ठोकत ख्रिस गेलने हा विक्रम नोंदवला होता. परंतु आता त्याच्यापेक्षाही कमी डावात हा पराक्रम करत लुईसने गेलला मागे टाकले आहे.
सर्वात कमी डावात टी२० क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारे फलंदाज
४२ डाव- एविन लुईस
४९ डाव- ख्रिस गेल
५७ डाव- कॉलिन मुनरो
७० डाव- ऍरॉन फिंच
७२ डाव- मार्टिन गप्टिल
याबरोबरच लुईस टी२० क्रिकेटमध्ये १०० किंवा जास्त षटकार मारणारा केवळ सातवा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी मार्टिन गप्टिल (१४७ षटकार), रोहित शर्मा (१३३ षटकार), ख्रिस गेल (११९), ऑयन मॉर्गन (११४ षटकार), कॉलिन मुनरो (१०७ षटकार) आणि ऍरॉन फिंच (१०७ षटकार) यांनी १०० षटकारांचा आकडा ओलांडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvPAK: पहिल्या टी२०त इंग्लंडच्या फलंदाजाचे झंझावती शतक, विक्रमांची लावली रांग
चित्यासारखी चपळता.. हवेत सुरेख डाईव्ह.. ब्राउंडीवर फॅबियन ऍलेनचा अविश्वसनीय झेल; एकदा पाहाच
टी२०त ९ वर्षांपासून भारताला पराभूत करू शकला नाही पाकिस्तान, विश्वचषकात ‘अशी’ राहिलीय कामगिरी