आयपीएलचा १४ वा हंगाम सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जात आहे, या हंगामात आतापर्यंत अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. या थराराने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. दुसऱ्या टप्प्यात एका पाठोपाठ एक उत्कृष्ट सामने खेळले जात आहेत. या आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू आहे आणि आता ही स्पर्धा समाप्तीच्या दिशेने हळूहळू पुढे जात आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोनच संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
या लीगमध्ये फलंदाज खूप धावा करत आहेत, ज्यात चौकार आणि षटकारांचाही समावेश आहे. दरम्यान, फलंदाजही आपल्या संघाला षटकारांसह विजय मिळवून देण्याची दमदार क्षमता दाखवत आहेत. या हंगामात असे अनेक फलंदाज होते ज्यांनी षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. षटकार मारून विजय मिळवणे सोपे काम नसते आणि अनेक वेळा फलंदाज या प्रयत्नात बाद होत असतात. चालू हंगामात असे ६ फलंदाज आहेत ज्यांनी हा पराक्रम केला आहे आणि या लेखात आपण त्या फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
ख्रिस मॉरिस
या मोसमात सर्वात आधी षटकार मारून जिंकवण्याचे काम ख्रिस मॉरिसने केले. राजस्थान रॉयल्सचा खेळाडू मॉरिसने याने शानदार फलंदाजी करत सामना जिंकवला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळलेल्या या मोसमाच्या ७ व्या सामन्यात त्याने ही किमया साधली होती. सामन्यात शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या टॉम करनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
श्रेयस अय्यर
दुखापतीनंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला कर्णधारपद मिळू शकले नाही. पण तो संघासाठी फलंदाज म्हणून योगदान देत आहे. श्रेयस अय्यरने या मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या ३३ व्या सामन्यात दमदार पुनरागमन केले आणि त्याने त्याच्या संघाला षटकारासह विजयाकडे नेले. अय्यरने डावाच्या १८ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेसन होल्डरला षटकार ठोकून सामना संपवला.
हार्दिक पंड्या
मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या, आतापर्यंत या लीगमध्ये फार काही करू शकलेला नाही, पण त्याने पंजाब किंग्जविरुद्ध शानदार फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने सामन्यात आक्रमक फलंदाजी करत मुंबई इंडियन्सला शेवटच्या सामन्यात विजय मिळवून दिला. हार्दिकने पंजाब किंग्जविरुद्ध संघासाठी विजयी षटकार खेळत सामना संपवला.
एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्सने या मोसमात जबरदस्त पुनरागमन केले आहे आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानी आहे, त्यांनी सनरायझर्स हैदराबादला आयपीएल २०२१ च्या ४४ व्या सामन्यात पराभूत केले. या सामन्यात सलामीवीरांनी चांगली सुरुवात केल्यानंतर, एमएस धोनीने अखेर आपल्या जुन्या शैलीत षटकारासह सामना संपवला. धोनीने सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर मोठा शॉट लगावला.
शाहरुख खान
पंजाब किंग्सने शुक्रवारी (१ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अप्रतिम फलंदाजी केली पण शेवटच्या षटकात शाहरुख खानने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. शाहरुख खानने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरच्या गोलंदाजीवर जोरदार षटकार खेचत सामना जिंकवला.
रविचंद्रन अश्विन
शनिवारी (२ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या सामन्यात कमी धावसंख्या पाहायला भेटली. या सामन्यात दिल्लीसमोर १३० धावांचे लक्ष्य होते, पण मुंबईच्या गोलंदाजांनी सतत विकेट घेण्यात यश मिळवले आणि सामना शेवटपर्यंत नेला. मात्र, डावाचे शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या कृणाल पंड्याच्या षटकात पहिल्याच चेंडूवर अश्विनने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटपटूनंतर टेनिसपटूंची ऑस्ट्रेलियन सरकारवर टीका; ‘हे’ आहे कारण
गोलंदाजी कधी करणार? स्वत: हार्दिक पंड्यानेच केला खुलासा
चेन्नईविरुद्ध जयस्वाल ‘यशस्वी’! इशान किशनला मागे टाकत ‘या’ विक्रमाच्या यादीत पटकावला अव्वल क्रमांक