दुबई| नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने २७ धावांनी बाजी मारली आणि चौथ्यांदा आयपीएल चषक उंचावला आहे. त्यांच्या या विजयाचा नायक ठरला सलामीवीर फाफ डू प्लेसिस. त्याने ८६ धावांची मॅरेथॉन खेळी खेळत संघाला विजय मिळवून देण्यासह सामनावीर पुरस्कारही जिंकला आहे. यासह तो एका विशेष क्लबमध्ये दाखल झाला आहे.
दुबईच्या मैदानावर रंगलेल्या चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील अंतिम सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. चेन्नईकडून एकटा डू प्लेसिस या महत्त्वपूर्ण सामन्यात अर्धशतक झळकावू शकला. पुढे आपल्या अर्धशतकाला मोठ्या खेळीत रुपांतरित करण्याचाही त्याने अटोकाट प्रयत्न केला. ५९ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ८६ धावा जोडल्या. २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शिवम मावीने वेंकटेश अय्यरच्या हातून त्याला झेलबाद करत त्याच्या खेळीचा अंत केला.
डू प्लेसिसच्या या दमदार खेळीच्या बळावरच चेन्नईने कोलकात्याला १९३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल कोलकाताकडून सलामीवीर शुबमन गिल आणि वेंकटेश अय्यरने अर्धशतके केली. परंतु इतर फलंदाजांना साजेशी फलंदाजी न करता आल्याने त्यांचा संघ सामन्याअंती १६५ धावाच करू शकला.
अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात सर्वाधिक ८६ धावांची खेळी करणाऱ्या डू प्लेसिसला या सामन्यात सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यासह तो आयपीएलच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरणाऱ्या खेळाडूंच्या खास यादीत सहभागी झाला आहे.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ बनलेले क्रिकेटपटू
२००८- युसूफ पठाण
२००९- अनिल कुंबळे
२०१०- सुरेश रैना
२०११- मुरली विजय
२०१२- मनविंदर बिस्ला
२०१३- कायरन पोलार्ड
२०१४- मनिष पांडे
२०१५- रोहित शर्मा
२०१६- बेन कटिंग
२०१७- कृणाल पंड्या
२०१८- शेन वॉटसन
२०१९- जसप्रीत बुमराह
२०२०- ट्रेंट बोल्ट
२०२१- फाफ डू प्लेसिस*
महत्त्वाच्या बातम्या-
ऐसा पेहली बार हुआ, इन चौदह सालों में! आयपीएल २०२१च्या उपविजेत्या केकेआरचा कोणालाही न जमलेला विक्रम
बस नाम ही काफी है! ‘या’ खेळाडूकडून एमएस धोनीचे कौतुक, सीएसकेवरही होतोय शुभेच्छांचा वर्षाव