क्रिकेटचा सर्वात दीर्घ चालणारा प्रकार म्हणजे कसोटी क्रिकेट. तब्बल ५ दिवस चालणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज धावांचा पाऊस पाडतात. कसोटीत फलंदाजांचा सर्वाधिक कस लागतो. तब्बल ५ दिवस मैदानावर टिकून फलंदाजी करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. मात्र, अनेकदा असे काही होते, ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण होते. असंच काहीसं झालं होतं एका कसोटी सामन्यात. एकीकडे ८००-९०० धावा करणारे संघही आपण पाहिलेत. मात्र, दुसरीकडे असेही काही संघ होते, ज्यांना ४०-५० धावाही करता आल्या नव्हत्या. असाच एक संघ आहे, जो कसोटी क्रिकेटमध्ये फक्त २६ धावांवर सर्वबाद झाला होता. त्याचबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. (Lowest Score In Test Cricket)
तारीख होती २८ मार्च, १९५५. याच दिवशी इंग्लंडच्या (England Cricket Team) गोलंदाजांनी न्यूझीलंड संघाच्या (New Zealand Cricket Team) फलंदाजांना दिवसा चांदण्या दाखवल्या होत्या. ऑकलंड येथे खेळण्यात आलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात तर यजमान न्यूजीलंड संघाने २०० धावा धावफलकावर लावल्या होत्या. इंग्लंड संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला. मात्र, त्यांनी पडत-झडत न्यूझीलंड संघाविरुद्ध ४६ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने एकूण २४६ धावा कुटल्या.
पण २८ मार्च, १९५५ रोजी ऑकलंड येथे जे झालं, त्याची कल्पनाही करवत नाही. विचार करा की, एखादा संघ ४६ धावांची आघाडी घेत मैदानावर उतरतो आणि एका डावाच्या अंतराने सामना जिंकतो. असंच काहीसं त्या दिवशी इंग्लंडने केले. त्यांनी पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली. मात्र, या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या २६ धावांवरच संपुष्टात आला. म्हणजेच, इंग्लंडने हा सामना एक डाव आणि २० धावांनी खिशात घातला. यामुळे न्यूझीलंडच्या २६ धावा हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा जागतिक विक्रम आहे.
न्यूझीलंड संघ ज्या डावात २६ धावांवर तंबूत परतला, त्यातील फक्त एकाच फलंदाजाला १० धावांचा आकडा पार करता आला. सलामीवीर बर्ट सटफ्लिकने ११ धावा केल्या. कर्णधार ज्योफ रेबोनने ७ आणि हॅरी केव्हने ५ धावा केल्या. न्यूझीलंडचे ५ फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले. ३ फलंदाजांनी प्रत्येकी १ धाव करत तंबू गाठला. न्यूझीलंडच्या या डावात इंग्लंडच्या ४ खेळाडूंनी गोलंदाजी केली. चारही गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. बॉब अप्लीयार्डने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
#OnThisDay in 1955, England bowled out New Zealand for 26 – the lowest score in the history of Test cricket.
Do you think the record will ever be broken? pic.twitter.com/lYlF5AUHaP
— ICC (@ICC) March 28, 2019
भारतीय संघाच्या नावावरही कमी धावसंख्येचा नकोसा विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या करणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघाचेही (Indian Cricket Team) नाव येते. भारतीय संघ २ वेळा ५०हून कमी धावांवर सर्वबाद झाला होता. पहिल्यांदा ही घटना १९७४मध्ये झाली होती. जेव्हा भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत खेळताना ४२ धावांवर सर्वबाद झाला होता. तब्बल ४६ वर्षांपर्यंत ४२ धावा ही भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या राहिली. सन २०२०मध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हे पाहायला मिळाले. यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावसंख्येवर तंबूत परतला. आता हीच भारतीय संघाची कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या आहे.
विश्वचषकातून ‘आऊट’ झालेल्या महिला संघाची विराटकडून पाठराखण, ट्वीट वाचून कराल कौतुक
ज्या नो बॉलमुळे भारत विश्वचषकातून पडला बाहेर, त्यावर कर्णधार मिताली राज काय म्हणाली? घ्या जाणून