लखनऊ सुपर जायंट्सच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘राजधानी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज मयंक यादव तंदुरुस्त झाला आहे. आता मंगळवारी लखनऊमध्ये होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यासाठी त्याचा संभाव्य 12 खेळाडूंमध्ये समावेश होऊ शकतो.
‘स्पोर्टस्टार’च्या रिपोर्टनुसार, लखनऊ सुपर जायंट्सचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी सांगितलं की, “सोमवारी एकना क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यापूर्वी मयंकनं सर्व फिटनेस चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत.” आयपीएलच्या या हंगामात मयंकनं त्याच्या वेगानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. तो सातत्यानं ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं चेंडू टाकण्यास सक्षम आहे. मात्र आयपीएल 2024 मध्ये अवघे दोन सामने खेळल्यानंतर तो जखमी झाला होता.
मयंक यादवनं आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध पदार्पण केलं. या सामन्यात लखनऊनं 21 धावांनी विजय मिळवला होता. या विजयात मयंक यादवनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानं 4 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले होते. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
त्यानंतर मयंकनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध देखील कहर केला. त्यानं लखनऊच्या 28 धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं 4 षटकांत 14 धावांत 3 बळी घेतले, ज्यासाठी त्याला पुन्हा सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
मयंक यादवकडे ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करण्याबरोबरच चांगली लाईन आणि लेंथही आहे. मात्र गुजरातविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला दुखापत झाली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याचा वेग कमी झाला होता. त्याला फक्त 1 ओव्हर टाकता आला. यानंतर त्याला मैदान सोडावं लागले. तेव्हापासून तो मैदानापासून दूर आहे. मयंकला जर दुखापत झाली नसती तर त्याची 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड होऊ शकली असती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ड्रॉप-इन खेळपट्टी’वर खेळला जाणार भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या काय आहे खासियत
ऋतुराज गायकवाडची दुखापत चेन्नईचं संकट वाढवणार? आयपीएल 2024 मधून बाहेर होणार का सीएसकेचा कर्णधार?
टी20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसनला पहिली पसंती, पंत-राहुलला मिळणार डच्चू?