तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत पुनरागमन करणे भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचे होते. रविवारी (दि. 29 जानेवारी) लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर भारताने न्यूझीलंडला 6 विकेट्सने धूळ चारली. या सामन्यात भारतापुढे फक्त 100 धावांचे आव्हान होते. मात्र, एवढ्या कमी धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करतानाही भारतीय संघाच्या नाकी नऊ आल्या होत्या. भारताने कसातरी सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते. सामन्यानंतर खेळपट्टीवरून चांगलाच गदारोळ माजला. यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, इकाना क्रिकेट स्टेडिअमच्या पीच क्यूरेटरला बडतर्फ करण्यात आले आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या टी20 सामन्यात 6 विकेट्स गमावत विजय साकारला होता. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने खेळपट्टीला धक्कादायक म्हटले होते. सामन्यादरम्यान या खेळपट्टीवर दोन्ही संघाच्या मिळून एकूण 39.5 षटकांमध्ये एकूण 200 धावा बनल्या. पंड्याने रांचीच्या जेएससीए स्टेडिअमच्या खेळपट्टीबाबतही नाराजी व्यक्त केली होती. पंड्या म्हणाला होता की, दोन्ही सामन्यातील खेळपट्ट्या टी20 सामन्याला न शोभणाऱ्या होत्या.
कमी वेळेत बनवली गेली होती खेळपट्टी
माध्यमांतील वृत्तांनुसार, खेळपट्टीबाबत वाढत्या वादानंतर पीच क्यूरेटर सुरेंद्र कुमार यांना बडतर्फ केले आहे. तसेच, आता संजीव अगरवाल पीच क्यूरेटरचे पद सांभाळतील. वृत्तामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, इकाना स्टेडिअमच्या पीच क्यूरेटरने या सामन्यासाठी काळ्या मातीच्या दोन खेळपट्ट्या तयार केल्या होत्या. असे असूनही, भारतीय संघ व्यवस्थापनाने शेवटच्या वेळेत क्यूरेटरकडून लाल मातीची नवीन खेळपट्टी तयार करण्यास सांगितले होते. कमी वेळेत नवीन खेळपट्टी योग्यरीत्या तयार केली जाऊ शकली नाही. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनीही खेळपट्टीवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, याबाबत पीच क्यूरेटरलाच विचारले पाहिजे.
एकही षटकार नाही
लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम ( Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) स्टेडिअममध्ये गोलंदाजांच्या दबदबा चांगलाच होता. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, भारतात पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यादरम्यान एकही षटकार मारला गेला नाही. संपूर्ण सामन्यात एकूण 14 चौकार मारले गेले, त्यातील 8 चौकार हे भारतीय फलंदाजांनी, तर उर्वरित 6 हे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मारले. सामन्यात फिरकीपटूंनी 30 षटके गोलंदाजी टाकत, या क्रिकेट प्रकारात विश्वविक्रम रचला.
तिसरा टी20 सामना महत्त्वाचा
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या मालिकेत उभय संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. न्यूझीलंडने पहिला टी20 सामना 21 धावांनी जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो 2-1ने मालिका खिशात घालेल. (lucknow ekana stadium pitch curator sacked after skipper hardik pandya called a socker wicket ind v nz 2nd t20i)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अटीतटीच्या सामन्यात पंड्याने ‘तो’ निर्णय घेताच भडकला गौतम गंभीर, काय म्हणाला वाचाच
आनंदाची बातमी! देशाची मान उंचावणाऱ्या लेकींचा ‘मास्टर ब्लास्टर’च्या हस्ते होणार सन्मान, जय शाहांची घोषणा