14 वर्षांचा एक मुलगा दिल्लीतील सोनेट क्लबमध्ये सराव करायचा. तिथे प्रशिक्षक होते तारक सिन्हा. एके दिवशी त्यांनी या मुलाच्या हाती चेंडू दिला, जो त्यानं त्याच्या वयोगटातील मुलांना टाकला. मात्र त्याचा चेंडू खेळताना मुलांना फारच त्रास होत होता. प्रशिक्षकांच्या लक्षात आलं की हा मुलगा त्याच्या वयोगटानुसार खूपच वेगवान गोलंदाजी करतोय. हा तो क्षण होता जेव्हा मयंक यादवलाही कळलं की तो किती वेगानं गोलंदाजी करू शकतो!
मयंक यादवनं आयपीएल खेळण्यापूर्वी दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे. तसा तो मूळचा बिहारच्या सुपौल जिल्ह्यातला. त्याला आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघात आणण्यात माजी क्रिकेटपटू विजय दहिया यांची सर्वात मोठी भूमिका आहे. दोन वर्षांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीदरम्यान मयंकला नेटमध्ये ॲक्शन करताना पाहून दहिया दंग झाले होते. दहिया जे त्यावेळी लखनऊ फ्रँचायझीमध्ये काम करत होते, त्यांनी संघाला मयंककडे लक्ष देण्यास सांगितलं. विजय दहिया यांनी मयंकला जवळून वेगवान गोलंदाजी करताना पाहिलं आणि त्यांना लगेच समजलं की या मुलाकडे ‘सुपर टॅलेंट’ आहे. मयंक दिल्लीत ‘सिरफोडू बॉलिंग’ म्हणजेच घातक बाउन्सरसाठी प्रसिद्ध आहे.
21 वर्षांचा मयंक यादव जेव्हा दिल्लीच्या प्रसिद्ध ‘सोनेट क्लब’मध्ये क्रिकेटची धडे घेण्यास आला तेव्हाच त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांना त्याच्यातील क्षमता लक्षात आली होती. सिन्हाही त्याच्या प्रतिभेनं खूप प्रभावित झाले होते. त्यांनी सोनट क्लबच्या अधिकाऱ्यांकडून फी घेण्यास नकार दिला होता.
मयंकच्या वडिलांचं नाव आहे प्रभू यादव. आपल्या मुलानं क्रिकेट खेळावं आणि तेही वेगवान गोलंदाज म्हणून, अशी त्यांची खूप इच्छा होती. प्रभू यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. ते पोलिसांच्या वाहनांसाठी सायरन आणि दिवे बनवायचे. त्यांच्या मते, त्यांनी मयंकला दिल्लीच्या सोनेट क्लबमध्ये प्रशिक्षक सिन्हा यांच्याकडे पाठवलं, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता.
मयंकनं आपल्या गतीनं दिल्लीतील फलंदाजांसाठी नेहमीच अडचणी निर्माण केल्या, जे सोनेट क्लबचे प्रशिक्षकही मान्य करतात. मयंकबद्दल असं म्हटलं जातं की, तो वेगवान गोलंदाजी करण्यात पारंगत आणि नेहमी आपल्या लक्ष्यावर फोकस असायचा. त्याच्या आयपीएल पदार्पणातही हेच पाहायला मिळालं. पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना पहिलाय सामन्यात त्यानं असाधारण कामगिरी करून दाखवली.
मयंकमध्ये वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता जन्मजात होती. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना प्रशिक्षक म्हणतात की, “तो अत्यंत अचूक होता, जे आश्चर्यकारक आहे. वेगवान गोलंदाजाला लाईनवर सातत्यपूर्ण गोलंदाजी करणं अवघड असतं. मात्र मयंक हुशार होता.” असं म्हटलं जातं की, मयंकच्या गोलंदाजीत हेल्मेटमुळे अनेकांचे प्राण वाचले, इतका तो प्राणघातक बाउन्सर टाकायचा!
सध्या सोशल मीडियावर देखील मयंकचं खूप कौतुक होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू डेल स्टेननं एक पोस्ट टाकून त्याचं कौतुक केलंय. तर स्टीव्ह स्मिथ म्हणाला, “मयंक यादवनं ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली पाहिजे. मी त्याला सामोरं जाण्यास उत्सुक आहे.”
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या दृष्टिकोनानुसार, मयंकला संघात संधी मिळू शकते. भारत जूनमध्ये टी20 विश्वचषकासाठी अमेरिका आणि त्यानंतर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा प्रवास करणार आहे. त्यावेळी मयंकला टीम इंडियाचा नेट गोलंदाज म्हणून संधी मिळू शकते.
आयपीएल 2024 मधील मयंक यादवची कामगिरी : आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत असलेल्या मयंक यादवनं 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 156.7 च्या वेगानं चेंडू टाकला. यापूर्वी त्यानं 30 मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध 12 व्या षटकात 155.8 किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी केली होती. या दोन्ही सामन्यात त्यानं 3-3 विकेट घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. आयपीएलमधील आपल्या पहिल्या दोन सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीविरुद्ध मयंक यादवचा कहर! वाऱ्याच्या वेगानं फेकला IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू
काय सांगता! सुपरमॅनच्या कपड्यात दिसला ईशान किशन, विमानतळावरील फोटो व्हायरल