मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३७ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना लखनऊने ३६ धावांनी जिंकला. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात शतकी खेळी केली. मात्र, असे असले तरी त्याच्यावर आणि लखनऊ संघावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
केएल राहुलसहीत संघालाही दंड
मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) संघाने षटकांची गती कमी राखल्याने केएल राहुल (KL Rahul) आणि अंतिम ११जणांच्या संघात खेळलेल्या खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार षटकांची गती कमी राखण्याची (Slow Over Rate) लखनऊ सुपर जायंट्सची (LSG) ही १५ व्या हंगामातील दुसरी वेळ होती. त्याचमुळे कर्णधार केएल राहुलवर २४ लाखांच्या दंडाची कारवाई झाली आहे. तसेच संघातील अन्य खेळाडूंना ६ लाख रुपयांचा किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के, जो कमी असेल तो दंड आकारण्यात आला आहे.
यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२ च्या २६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनविरुद्धच षटकांची गती कमी राखण्याची चूक केली होती. त्यामुळे त्यावेळी राहुलवर १२ लाख रुपयांचा दंड झाला होता. पण आता हीच चूक दुसऱ्यांदा झाली आहे.
राहुलवर तिसऱ्यांदा कारवाई
केएल राहुलवर आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) कारवाई होण्याची तशी ही तिसरी वेळ आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यादरम्यान आचारसंहीतेचा भंग केल्याप्रकरणी देखील सामना शुल्काच्या २० टक्के दंड झाला होता.
केएल राहुलवर लागू शकते बंदी
आयपीएलच्या नियमांनुसार षटकांची गती कमी राखण्याची चूक हंगामात पहिल्यांदा झाल्यास त्या संघाच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड होतो. हीच चूक दुसऱ्यांदा झाल्यास कर्णधारासह संघातील खेळाडूंनाही दंड भरावा लागतो. यावेळी कर्णधाराला २४ लाख आणि संघातील अन्य खेळाडूंना ६ लाख रुपयांचा किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के, जो कमी असेल तो दंड ठोठावण्यात येतो.
पण, हंगामात षटकांची गती कमी राखण्याची चूक तिसऱ्यांदा झाली, तर कर्णधारावर ३० लाख रुपयांचा दंड होतो आणि त्याचबरोबर एका सामन्याची बंदी घातली जाते. तसेच अंतिम ११ जणांच्या संघात सामील असलेल्या खेळाडूंवर १२ लाखांचा किंवा सामनाशुल्काच्या ५० टक्के, जो कमी असेल तो दंड करण्यात येतो.
याच नियमांमुळे केएल राहुलने षटकांची गती कमी राखण्याची चूक तिसऱ्यांदा केली, तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी लागू शकते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईची गाडी पराभवाचे स्टेशन सोडेना! लखनऊने ३६ धावांनी विजय साकारत गुणतालिकेत पटकावला चौथा क्रमांक
इशानचं नशीबच फुटकं! बिश्नोईच्या चेंडूवर विचित्र पद्धतीने झाला बाद, पाहणारा प्रत्येकजण हैराण