देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये सोमवारी (21 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध मिझोराम असा सामना खेळला गेला. या सामन्यात महाराष्ट्राने 183 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अनुभवी राहुल त्रिपाठी याचे सलग तिसरे शतक या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावणे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड हा या सामन्याला देखील अनुपस्थितीत राहिला. राहुल त्रिपाठी व पवन शहा यांनी 49 धावांची सलामी दिली. पवनने 31 धावा केल्या. यानंतर त्रिपाठी व कर्णधार बावणे यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी विरोधी संघाच्या गोलंदाजांवर अक्षरशः आक्रमण केले. दोघांनी मिळून दुसऱ्या गड्यासाठी तब्बल 220 धावांची भागीदारी केली. बावणेचे शतक केवळ पाच धावांनी हुकले.
मात्र, राहुलने संधी साधत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे स्पर्धेतील सलग तिसरे शतक ठरले. 99 चेंडूंवर 107 धावा करून तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर आलेल्या अझीम काझीने केवळ 39 चेंडूवर 67 धावांचा तडाखा दिला. महाराष्ट्राने निर्धारित 50 षटकात 4 बाद 341 धावा कुटल्या.
या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मिझोराम संघ सामन्यात कुठेच दिसला नाही. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज श्रीवत्स गोस्वामीने सर्वाधिक 35 धावा केल्या. महाराष्ट्राचा युवा फिरकीपटू विकी ओस्तवाल याने सर्वाधिक चार बळी मिळवले. मिझोराम संघ निर्धारित 50 षटकात 8 बाद 158 धावा करू शकला. यासह महाराष्ट्र संघ स्पर्धेत आत्तापर्यंत अजिंक्य राहिला आहे.
(Maharashtra Beat Mizoram By 183 Runs Rahul Tripathi Hits Third Consecutive Century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पूरनची हकालपट्टी? वेस्ट इंडीजला मिळणार नवा कर्णधार; आयपीएल गाजवलेल्या खेळाडूला मिळू शकते जबाबदारी
स्वत:साठी नाही, तर संघासाठी! धावा कुटण्याच्या नादात विक्रम मोडलाय हेच विसरून गेलेला जगदीशन, म्हणाला…