जयपूर, २० जून २०२३: महाराष्ट्र आयर्नमॅन आणि तेलुगू टॅलोन्स यांच्यातला प्रीमिअर हँडबॉल लीगमधील मंगळवारी झालेला सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. प्रीमिअर हँडबॉल लीगमधील हा दुसरा ड्रॉ सामना राहिला.
प्रीमिअर हँडबॉल लीगमधील दोन अव्वल संघ महाराष्ट्र आयर्नमॅन व तेलुगू टॅलोन्स हे समोरासमोर आले आणि त्यांच्या खेळाने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती. आयर्नमॅन आणि टॅलोन्स या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे आणि त्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी दोन तगडे संघ समोरासमोर आल्याने चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली.
आयर्नमॅन संघाचे प्रशिक्षक डॉ. सुनिल कुमार यांनी आजच्या सामन्यात काही महत्त्वाच्या खेलाडूंना विश्रांती दिली होती. कर्णधार इगोर चिसेलिओव्ह आणि कियानी हे सुरुवातीपासून मैदानावर उतरले नाही, तर नवीन देश्वाल आज खेळला नाही. तरीही आयर्नमॅनच्या खेळाडूंनी दमदार खेळ केला. मनजीत कुमार, सुमित कुमार आणि सुमित घंघास यांनी दमदार आक्रमण करताना पहिल्या १५ मिनिटांत संघाला ७-५ अशी आघाडी मिळवून दिली.
टॅलोन्सना आयर्नमॅनचा बचाव भेदण्यात अपयश आलेले पाहायला मिळाले. चिसेलिओव्ह आणि कियानी यांच्या अनुपस्थितीतही आयर्नमॅनच्या आक्रमणाची धार तीव्र राहिली. मनजीत आणि सुमित घंघास या दोघांचा खेळ अप्रतिम झाला आणि त्यांनी आयर्नमॅनला आघाडी मिळवून दिली. शाबनोव्हने अप्रतिम खेळ केला, परंतु त्याला अन्य सहकाऱ्यांकडून साथ मिळाली नाही. पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्र आयर्नमॅनने १६-११ अशी आघाडी मजबूत केली.
तेलुगूने दुसऱ्या हाफमध्ये स्टार्टिंग लाईन-अपमध्ये तगडा संघ मैदानावर उतरवला. तरीही आयर्नमॅनचा गोल करण्याचा सपाटा कायम होता. मोहित पुनिया आणि विजय ठाकूर यांनी आयर्नमॅनची आघाडी वाढवली. तेलुगूच्या मोहित कुमारने चांगला खेळ करताना सातत्याने संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
पण, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी त्यांना डोकं वर काढू दिले नाही आणि दुसऱ्या हाफच्या मध्यंतरापर्यंत २३-१९ अशी आघाडी कायम ठेवली. पण, कैलाश पटेलने अंतिम सत्रात सातत्याने गोल करताना पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. दविंदर सिंग भुल्लर आणि नसीब सिंग यांनीही आक्रमण करताना पिछाडी दोन गोल्सने कमी केली. सामन्याच्या अखेरच्या मिनिटांत राहुल नैनने गोल केला, त्यात कैलाश पटेलने गोल करून तेलुगूला बरोबरी मिळवून दिली. महाराष्ट्रा आयर्नमॅन आणि तेलुगू टॅलोन्स सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. मनजीत कुमारने सर्वाधिक ९ गोल्स केले, तर तेलुगूकडून दविंदर सिंग भुल्लरने ७ गोल्स केले. मनजीत कुमारला सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला. (Maharashtra Ironman’s tough fight, Telugu Talons held off in draw)
अंतिम गुण – महाराष्ट्र आयर्नमॅन ३० बरोबरी वि. तेलुगू टॅलोन्स ३०.
महत्वाच्या बातम्या –
कहर झाला! दोनच दिवसांत मोडला वनडेमधील सर्वात मोठा विक्रम, झिंबाब्वेच्या खेळाडूचा अफलातून कारनामा
शुबमन गिल-सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत; सचिनची लेक लवकरच तेंडुलकर आडनाव लावणं बंद करणार!