रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार फलंदाज विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा अनुभवी यष्टीरक्षक एमएस धोनी यांच्यात चांगले नाते आहे. जेव्हा जेव्हा ते दोघे भेटतात तेव्हा चाहते खूप आनंदी होतात. शुक्रवारी चेपॉक स्टेडियममध्ये मैत्रीचे असे एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले.
आयपीएल 2025 च्या आठव्या सामन्यात सीएसके आणि आरसीबी आमनेसामने हेते. आरसीबीने 50 धावांनी संस्मरणीय विजय मिळवला. आरसीबीने 17 वर्षांनंतर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सीएसकेचा पराभव केला. सामना संपल्यानंतर कोहली आणि धोनी भेटले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की आरसीबीच्या विजयानंतर कोहली लगेच धोनीकडे जातो. धोनी प्रथम हात पुढे करतो. हस्तांदोलन केल्यानंतर धोनी आणि कोहली मिठी मारतात. मैदानावर भेटण्याव्यतिरिक्त, दोघेही ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर बोलत असल्याचेही दिसून आले. धोनी आणि कोहलीच्या भेटीवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
VIDEO OF THE MATCH FROM CHEPAUK ❤️
— Johns. (@CricCrazyJohns) March 29, 2025
– Virat Kohli hugging MS Dhoni & talking after the match. pic.twitter.com/WVaZRwaMq7
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 7 गडी गमावून 196 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कर्णधार रजत पाटीदारने 32 चेंडूत सर्वाधिक 51 धावा केल्या. याशिवाय फिल सॉल्टने 32 धावांची खेळी खेळली.
चेन्नई सुपर किंग्जकडून नूर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 197 धावांच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजीला आले आणि ते 20 षटकांत 8 गडी बाद 146 धावाच करू शकले. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 50 धावांनी मोठा विजय मिळवला.






