Loading...

…आणि मनोज तिवारीचा फोटो झाला या कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 व्या फेरीत बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना बंगालकडून मनोज तिवारीने सोमवारी(20 जानेवारी) त्रिशतकी खेळी केली आहे.

तिवारीने 414 चेंडूंचा सामना करताना 30 चौकार आणि 5 षटकारांसह 73.19 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 303 धावा केल्या. तिवारीचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक आहे.

हे त्रिशतक केल्यानंतर तिवारीने एक खास फोटो त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसते की तो त्याची बॅट जवळ घेऊन झोपला आहे. विशेष म्हणजे त्याच्या बॅटवर त्याच्या मुलाचे नाव कोरलेले आहे.

हा फोटो पोस्ट करताना त्याने ट्विट केले आहे की ‘आज रात्री मला चांगली झोप लागेल. हैद्राबाद विरुद्ध प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले त्रिशतक करण्याचा आनंद आहे. मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल आणि प्रेमाबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.’

Loading...

आणखी एक खास गोष्ट म्हणजे हैद्राबाद विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी(19 जानेवारी) तिवारीने शतक केल्यानंतर एक खास ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने सांगितले होते की तो जी बॅट वापरत आहे त्यावर त्याचा मुलगा युवानचे नाव कोरले आहे. तसेच त्याने त्याच्या बॅटचा आणि मुलाचा फोटोही शेअर केला होता.

Loading...

तिवारीने 2008मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 2015 पर्यंत 12 वनडे सामने खेळले तर 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत 287 धावा आणि टी20मध्ये 15 धावा केल्या आहेत.

सध्या बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात तिवारीने हे त्रिशतक करताना अनुस्तुप मुजुमदार(59) बरोबर चौथ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. नंतर श्रीवत्स गोस्वामीला(95) साथीला घेत त्याने 5 व्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी रचली.

तिवारीेचे त्रिशतक पूर्ण होताच बंगालने त्यांचा पहिला डाव 7 बाद 335 धावांवर घोषित केला.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या हैद्राबादला पहिल्या डावात सर्वबाद 171 धावाच करता आल्या असल्याने बंगालने त्यांना फॉलोऑन दिला आहे.

Loading...
You might also like
Loading...