बांगलादेशचा सध्याचा वन-डे कर्णधार मर्शफी मुर्तझा राजकारणात आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. तो नुकतीच बांगलादेशमध्ये पार पडलेल्या संसदीय निवडणूकीत नारेल -2 मतदारसंघातून विजयी झाला असून तो आता खासदार झाला आहे.
त्याने राजकारणात जरी प्रवेश केला असला तरी तो बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचे त्याने याआधीच स्पष्ट केले आहे. तसेच त्याने आयसीसीच्या 2019 विश्वचषकातही खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
याचबरोबर क्रिकेटमधील कारकिर्द संपल्यानंतर बांगलादेशमधील लोकांची सेवा करण्याची संधी राजकारणात प्रवेश केल्यानंतर मिळणार असल्याचेही तो म्हणाला होता. तसेच सध्या तो विश्वचषकाचा विचार करत असून त्यानंतर निवृत्तीचा विचार करेल असे त्याने सुचवले होते.
मर्शफी ज्या जिल्ह्यातील आहे तेथूनच त्याने ही निवडणुक लढवली आहे. तसेच तो क्रिकेट खेळत असतानाच राजकारणी बनलेला तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
मर्शफी हा बांगलादेशचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने वन-डेत 67 सामन्यात नेतृत्व करताना 38 विजय संघाला मिळवुन दिले आहेत.
मर्शफीने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असताना त्याला प्रधानमंत्री असलेल्या शेख हसीना यांनीही परवानगी दिली आहे.
क्रिकेटपटूंनी यापुर्वीही राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. भारताप्रमाणेच अनेक देशांत क्रिकेटपटूंनी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले होते. त्यातील काही यशस्वी झाले तर काही अपयशी.
पाकिस्तानात इम्रान खान हे विश्वचषक विजेते कर्णधार तर सध्या पंतप्रधान आहेत. भारतात नवज्योत सिंग सिद्धू, किर्ती आझादसह अनेक खेळाडू राजकारणात आहेत तर भारतीय उपखंडातील श्रीलंकेतच अर्जून रणतुंगा हे माजी कर्णधार राजकारणात आहेत.
मर्शफी सध्या केवळ वन-डे क्रिकेट खेळत असून टी20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. वन-डे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मर्शफीकडे आहे.
त्याने 36 कसोटीमध्ये 78 विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेमध्ये 199 सामन्यात 252 विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–टाॅप ५- टी२०मधील २०१८ वर्षातील गमतीशीर आकडेवारी
–Video- यावर्षी टीम इंडियाच्या शिलेदारांचा हा व्हिडीओ झाला सर्वाधिक व्हायरल
–स्म्रीती मानधना ठरली २०१८ ची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
–मेलबर्न कसोटीतील विजयामुळे टीम इंडियाला झाला मोठा फायदा