प्रिय सचिन,
सा.न.वि.वि.
आज तू ४६ वर्षांचा झालास.खरं तर तुझ्याविषयी काय लिहावे असा विचार २ दिवसांपासून सतत मनात घोळत होता पण काहीच सुचत नव्हते;कारण तुझ्याविषयीची अशी एकही गोष्ट नाही ज्यावर काही लिहिले गेले नाही किंवा बोलले गेले नाही.पण तरीही तुझ्या या चाहत्याला मोह आवरला नाही आणि सरळ तुलाच पत्र लिहायला घेतले.
आज मला तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत,जाब विचारायचा आहे तुला.क्रिकेट कळायला लागल्यापासून फक्त एकच नावाचा जप मी आजतागायत करत आलो आहे ते म्हणजे ‘सचिन’.तुझ्यावर वर कोणी टीका केली तर सहन होत नाही,तळपायाची आग मस्तकात जाते.एरवी शांत असणारा मी अचानक भावनिक आणि आक्रमक होतो.हे असे का होते?अशी कोणती मोहिनी घातली आहेस तू माझ्यावर आणि माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांवर?
शाळेत असतांना मी अत्यंत शिस्तप्रिय विद्यार्थी होतो.शाळा बुडवणे हा प्रकार मला माहीतच नाही.अगदी मुसळधार पावसातही मी शाळेत हजर असे!मात्र,तुझा सामना असला की मी हमखास शाळेला दांडी मारायचो.तू ज्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावलेस ना तेव्हा मी १२ वीत होतो.त्या दिवशी तर ‘पोटात दुखतंय’ अस चक्क खोटं बोलून मी चालू वर्गातून धूम ठोकली.तुझी फलंदाजी पाहण्यासाठी एव्हढा आटापिटा का केला असेल मी?
माझ्या खोलीतील तुझे पोस्टर्स रंग- रंगोटीच्या कामासाठी काढून टाकावे लागलेत,त्या दिवशी एक घास गळ्याच्या खाली उतरला नाही.पोस्टर्स सारखी पोस्टर्स होती ती…आणता आली असती दुसरी,तरी का मी स्वतःलाच त्रास करून घेतला असेल?तू शून्यावर बाद झालास के उगाच चिडचिड होत असे,तू ‘नवद्दी’ गाठली की तुझ्यापेक्षा ‘नर्व्हस’ मीच होत असायचो.का?हद्द म्हणजे माझ्या आईला आणि तिच्यासारख्या क्रिकेट मध्ये काडीमात्रही रस नसलेल्या गृहिणींना एका खेळाडूचे नाव हमखास माहीत असे-ते अर्थातच तुझेच होते.हा चमत्कार कसा रे साध्य केलास?या प्रश्नांची उत्तरे कदाचित तुझ्याकडेही नसतील.
तू घेतलेल्या अपार मेहनतीत,आचरेकर सरांनी तुझ्यावर केलेल्या संस्कारांत,तुझा भाऊ अजित ने तुझ्यासाठी केलेल्या त्यागात,तुझ्या ठायी असलेल्या विनम्र स्वभावात कदाचित या प्रश्नांची उत्तरे सापडावीत;रावळपिंडी एक्सप्रेस च्या गोलंदाजीची तू काढलेली पिसे,शेन वॉर्न ची उडविलेली झोप,शारजाहत तू आणलेले वादळ,स्टिव्ह बकणर ने तुला कितीही वेळा चुकीचे बाद देऊनही कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता तुझे शांतपणे मैदानाबाहेर जाणे,पंचांनी बाद दिलेले नसतानाही तुझे आपणहुन मैदान सोडणे,विराट कोहली सारख्या अनेक युवा खेळाडूंना तुझ्याकडून क्रिकेटर होण्याची मिळालेली प्रेरणा या सगळ्यांमध्ये कदाचित ही उत्तरे सापडावीत!
तू खेळाडू म्हणून जेवढा महान होतास तितकाच माणूस म्हणूनही चांगला आहेस.तुझ्या कृतीतून तू हे वेळोवेळी सिद्ध केले आहेच.मग ते ‘आपणालायाच्या’ माध्यमातून असहाय्य मुलांसाठी मदत असो किंवा खासदार म्ह्णून मिळणारा संपुर्ण पगार व भत्ते प्रधानमंत्री राहत निधीत दान करणे असो,समाजविषयीची कृतज्ञता नेहमीच तुझ्या कृतीतून दिसून आली आहे. तू राज्यसभेत फार गेला नाही,भारतीय क्रिकेट साठी सध्या काही योगदान तू करत नाहीयेस अशी तक्रार करणाऱ्यांची तोंडे तू नेहमी प्रमाणेच तुझ्या कृतीतून बंद करशील हीच अपेक्षा-नव्हे विश्वास व्यक्त करतो.
ता.क.:वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा
-शारंग ढोमसे