गोवा- सेमी फायनलच्या शर्यतीत कायम राहण्याच्या शर्यतीत आज इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) चेन्नईयन एफसी आणि ओदिशा एफसी यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. रहिम अलीने दुसऱ्याच मिनिटाला चेन्नईयनला दणक्यात सुरुवात करून दिली खरी, परंतु त्याला ओदिशाकडून झेव्हियर हर्नांडेझ (१८ मि.) व जॉनाथस क्रिस्टियन ( ५१ मि. ) या जोडीकडून प्रत्युत्तर मिळाले. नेरिजस व्हॅलस्कीस ( ६९ मि. ) अप्रतिम गोल करून चेन्नईयनचा पराभव टाळला आणि सामना २-२ असा बरोबरीत सोडवला.
ओदिशा एफसी आणि चेन्नईयन एफसी हे दोन्ही संघ विजयीपथावर परतण्यासह उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरले. पण, चेन्नईयनने दुसऱ्याच मिनिटाला आक्रमण केले. थोएला सिंगने चेन्नईनच्या खेळाडूला बॉक्सबाहेर पाडल्यामुळे रेफरींनी त्यांना फ्री किक दिला आणि त्यावर नेरिजस व्हॅलस्कीस गोल करण्यासाठी आला. पण तो ब्लॉक केला गेला अन् चेंडू पुन्हा माघारी परतला. रहिम अलीनं ही संधी साधली आणि चेन्नईयनसाठी गोल केला.
पण, चेन्नईयनचा हा आनंद फार काळ टिकला नाही. १८व्या मिनिटाला ओदिशाची यशस्वी जोडी झेव्हियर हर्नांडेझ व जॉनाथस क्रिस्टियन यांनी चेन्नईयनला धक्का दिला. मैदानाच्या मध्यरेषेवर हर्नांडेझला चेंडू मिळाला त्याने बचावपटूंना चकवून तो क्रिस्टियन याच्याकडे पास केला. त्यानंतर बॉक्सबाहेर क्रिस्टियनने पुन्हा तो झेव्हियरला दिला अन् त्याने तिथूनच सुरेख गोल केला. गोलरक्षक देबाजित मजुमदार काहीच करू शकला नाही. ४५व्या मिनिटाला क्रिस्टयनकडून आणखी एक प्रयत्न झाला, परंतु यावेळेस गोलरक्षकाने तो अडवला. पहिला हाफ १-१ असा बरोबरीत सुटला.
पहिल्या हाफच्या अखेरच्या मिनिटाला आलेल्या अपयशाची भरपाई क्रिस्टियनने मध्यंतरानंतर लगेचच केली. ५१व्या मिनिटाला चेन्नईयनच्या बचावपटूंना चकवून सुरेख गोल केला. ओदिशाने २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्याचे पारडे क्षणाक्षणाला एकीकडून दुसरीकडे झुकताना दिसत होते. ६९व्या मिनिटाला नेरिजस व्हॅलस्कीसने चेन्नईयनला बरोबरीचा गोल करून दिला. बॉक्सच्या आतून मिळालेल्या फ्री किकवर हा गोल झाला. त्यानंतर दोन्ही संघांकडून बरोबरीसाठी सर्व प्रयत्न झाले. पण सामना २-२ असा बरोबरीत सुटला.
निकाल – चेन्नईयन एफसी २ ( रहिम अली २ मि., नेरिजस व्हॅलस्कीस ६९ मि. ) बरोबरी विरूद्ध ओदिशा एफसी २ ( झेव्हियर हर्नांडेझ १८ मि., जॉनाथस क्रिस्टियन ५१ मि. )