पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकाआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये लागोपाठ बदल होत आहेत. रमीज राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चेअरमन पद स्वीकारून काही तास झाले असतानाच, पाकिस्तानने आगामी विश्वचषकासाठी आपल्या दोन नव्या प्रशिक्षकांची घोषणा केली.
हे दोघे करणार पाकिस्तानला मार्गदर्शन
पीसीबीचे नवनियुक्त चेअरमन रमीज राजा यांनी पदभार स्वीकारताच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नव्या मुख्य व गोलंदाजी प्रशिक्षकांची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचा माजी आक्रमक सलामीवीर मॅथ्यू हेडन हा संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज वर्नोन फिलॅंडर हा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करेल.
राजा यांनी केले कौतुक
दोन्ही नव्या प्रशिक्षकांबाबत बोलताना राजा म्हणाले, “मला हेडन व फिलॅंडर यांना पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून घोषित करताना आनंद होत आहे. हेडनकडे क्रिकेटचा अफाट अनुभव आहे. त्याचा फायदा संघाला होईल. त्याच्यासारखा एक आक्रमक ऑस्ट्रेलियन खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये असल्याने खेळाडूंची मानसिकता बदलण्यास मदत होईल. फिलॅंडरची कारकीर्द देखील दैदिप्यमान राहिली होती. मी त्याला व्यक्तीशा ओळखतो. गोलंदाजीतील बारकावे त्याला चांगलेच माहीत आहेत.”
प्रशिक्षकांनी दिले होते राजीनामे
पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी मागील आठवड्यात अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. टी२० विश्वचषकाच्या तोंडावर त्यांनी हा निर्णय घेतला. कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचा, अतिरिक्त ताणाचा व सततच्या बायो-बबलमूळे हा निर्णय घेतल्याचे कारण त्यांनी सांगितले होते.
राजा बनले पीसीबी चेअरमन
पाकिस्तानचे माजी कर्णधार व प्रसिद्ध समालोचक रमीज राजा यांची सोमवारी (१३ सप्टेंबर) पीसीबी चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. ते तीन वर्षासाठी या पदावर असतील. देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळ्ल्यानंतर चेअरमन होणारे ते केवळ चौथे खेळाडू आहेत. यापूर्वी २००३-२००४ मध्ये ते पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! आयसीसीने ‘त्या’ कुत्र्याला दिला खास ‘डॉग ऑफ द मंथ’ पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
जो रुट ठरला बुमराह, आफ्रिदीला भारी; जिंकला ऑगस्ट महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार
पत्नीच पतीचं पाठबळ!! खराब फॉर्मशी झगडत असताना धनश्रीने ‘असा’ वाढवला चहलचा आत्मविश्वास