ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेडने सांगितले की 2024 च्या टी-20 विश्वचषकातील सुपर-8 मध्ये भारताविरुद्धचा पराभव हा तो क्षण होता जेव्हा त्याला समजले की, त्याची ऑस्ट्रेलियाबरोबरची कारकीर्द संपली आहे.
वेडने 13 वर्षे ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले आणि 225 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 36 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने टी20 विश्वचषकाच्या तीन आवृत्त्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 2021 मध्ये, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी20 विश्वचषक जिंकला आणि वेड त्या संघाचा उपकर्णधार होता.
वेडने म्हटले की, “यंदा टी20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीत भारताविरुद्ध 24 धावांनी झालेला पराभव हा तो क्षण होता जेव्हा मला समजले की माझी कारकीर्द संपली आहे. तो एक भावनिक क्षण होता. मी या संघात खेळण्याचा आनंद घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या संघाच्या कोचिंग स्टाफशी जवळीक निर्माण झाली आहे.”
तो पुढे म्हणाला, “भारताविरुद्धच्या पराभवांतर मी बसलो आणि माझ्या कारकिर्दीवर व संपूर्ण गोष्टीबद्दल थोडा भावनिक विचार केला. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत मी चांगली कामगिरी केली आहे. ज्या पद्धतीने संघ बांधला, त्यावरून मला फिनिशिंगची भूमिका मिळाली.”
वेडने ऑस्ट्रेलियाकडून 36 कसोटी सामने खेळले असून, चार शतके आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने त्याने 1613 धावा केल्या आहेत. त्याचवेळी त्याने 97 एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 1867 धावा केल्या. 92 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेडने तीन अर्धशतकांच्या मदतीने 1202 धावा केल्या. वेड ऑस्ट्रेलियात देशांतर्गत स्तरावर खेळत राहील आणि जगभरातील फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये भाग घेईल. ऑस्ट्रेलिया संघाबरोबरच तो आपला कोचिंग प्रवासही सुरू करणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी वेडला कोचिंग स्टाफमध्ये स्थान देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025 लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? ‘हा’ संघ पहिल्या क्रमांकावर
‘या’ स्टार खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवडकर्त्यांवर भडकले गावसकर, म्हणाले…
BGT; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवडकर्त्याला झाली कोहली-पुजाराच्या जोडीची आठवण! म्हणाला…