३० वर्षांनंतर अगरवाल न्यूझीलंडमध्ये असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय

वेलिंग्टन। आजपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.

अगरवालने एका बाजूने भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांच्या विकेट जात असताना आज पहिल्या सत्रात किल्ला लढवला होता. भारताने आज पहिल्या सत्रात 3 बाद 79 धावा केल्या होत्या. यावेळी पहिल्या सत्राखेर अगरवाल 29 धावांवर खेळत होता. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये तब्बल 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताच्या सलामीवीर फलंदाजाने(मयंक अगरवाल) कसोटी सामन्याचे पहिले सत्र खेळून काढण्याचा विक्रम झाला आहे.

याआधी 30वर्षांपूर्वी 1990 मध्ये नेपियर येथे झालेल्या कसोटी सामन्यात मनोज प्रभाकर यांनी असा कारनामा केला होता. सलामीला खेळायला आलेल्या प्रभाकर यांनी त्या कसोटी सामन्यात भारताकडून पहिल्या डावात न्यूझीलंड विरुद्ध 268 चेंडूत 95 धावा केल्या होत्या.

तो कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 358 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात 1 बाद 178 धावा केल्या होत्या. या सामन्यातील पहिल्या आणि शेवटच्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नव्हता.

आजपासून वेलिंग्टन येथे सुरु झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या सत्रात चांगला खेळ केल्यानंतर मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अगरवालने 84 चेंडूत 34 धावांवर असताना विकेट गमावली. तत्पूर्वी त्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर 48 धावांची भागीदारी रचली होती.

तो बाद होण्याआधी भारताने पृथ्वी शॉ(16), चेतेश्वर पुजारा(11) आणि विराट कोहलीच्या(2) विकेट्स पहिल्या सत्रातच गमावल्या होत्या. तर अगरवाल पाठोपाठ भारताने दुसऱ्या सत्रात हनुमा विहारीचीही(7) विकेट गमावली.

तसेच दुसऱ्या सत्रानंतर पावसाला सुरुवात झाल्याने पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे भारताने पहिल्या दिवसाखेर 55 षटकात 5 बाद 122 धावा केल्या. यावेळी रहाणे 38 आणि रिषभ पंत 10 धावांवर नाबाद आहेत.

You might also like