---Advertisement---

‘शतकवीर’ मयंक अन् श्रेयसची कसोटी क्रमवारीत मोठी उडी, अश्विनला तर गोलंदाजीसह अष्टपैलू म्हणूनही बडा फायदा

On: बुधवार, डिसेंबर 8, 2021 5:09 PM
Team India
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका काही दिवसांपूर्वीच संपली आहे. या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा १-० असा धुव्वा उडवला. या संपूर्ण मालिकेदरम्यान आपल्या दमदार प्रदर्शनात सातत्य ठेवणाऱ्या भारताच्या अष्टपैलू आर अश्विन याला मालिकावीर निवडण्यात आले. आपल्या याच प्रदर्शनाचे फळ त्याला आयसीसी कसोटी क्रमवारी (ICC Test Ranking) मध्ये मिळाले आहे. त्याला अष्टपैलूंच्या क्रमवारीमध्ये मोठा फायदा झाला आहे.

अश्विनने (R Ashwin) न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक १४ विकेट्स घेतल्या होत्या. तर मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. २ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी करताना एकूण ८ विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी कानपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने प्रत्येकी डावात ३-३ अशा एकूण ६ विकेट्स काढल्या होत्या. तसेच संपूर्ण मालिकेत ७० धावाही फटकावल्या होत्या.

याच प्रदर्शनाचा फायदा त्याला कसोटी क्रमवारीत झाला असून त्याने अष्टपैलूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. ३६० गुणांची कमाई करत तो तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याच्यापुढे फक्त वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर आहे. त्याच्या खात्यात सर्वाधिक ३८२ गुण आहेत.

दुसरीकडे कसोटी मालिकेतील फक्त एक सामना खेळू शकलेल्या अष्टपैलू रविंद्र जडेजाला मात्र मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. तो दुसऱ्या स्थानावरुन सरळ खाली घसरत चौथ्या स्थानावर आला आहे. त्याला मागे टाकत इंग्लंडचा बेन स्टोक्स तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

https://twitter.com/ICC/status/1468495119527600128?s=20

गोलंदाजांच्या क्रमवारीतही अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सुद्धा टॉप-१० मध्ये आहे. तो दहाव्या स्थानावर आहे.

मयंक आणि शुबमनलाही भरपूर फायदा
फलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचं झाल्यास, भारताचे सलामीवीर मयंक अगरवाल (Mayank Agarwal) आणि शुबमन गिल (Shubamn Gill) यांनी मोठी उडी घेतली आहे. मुंबई कसोटीतील शतकवीर मयंकला तब्बल ३१ स्थानांचा फायदा झाला आहे. ७१२ गुणांसह तो अकराव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने मुंबई कसोटीत ४ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने १५० धावा केल्या होत्या. तर युवा सलामीवीर शुबमन गिल यालाही २२ स्थानांचा फायदा झाला असून त्याने ४६ व्या स्थानी उडी घेतली आहे.

या दोघांव्यतिरिक्त आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरच्या स्थानामध्येही प्रगती झाली आहे. तो १० स्थानांनी उडी घेत ६६ व्या स्थानावर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बाबो! स्पायडरमॅन अन् तोही थेट मैदानात, पाहा लाईव्ह सामन्यादरम्यानचा ‘तो’ भन्नाट व्हिडिओ

जेव्हा धोनीने पाकिस्तानविरुद्ध पहिले कसोटी शतक ठोकल्यानंतर म्हटले होते, ‘बस्स यार.. आता निवृत्ती घेऊ’

“भारताकडे यावेळी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात हरवण्याची सुवर्णसंधी”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---