आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेल्मेटवर चेंडू लागल्याने खेळाडूंना जाणवणारे ‘कन्कशन’ संपूर्ण संघासाठी अनेकदा त्रासदायक ठरते. एखादा प्रमुख खेळाडू सामन्यातून बाहेर होतो. अनेकदा कन्कशनमुळे खेळाडूंच्या जीवितास धोका निर्माण झालेला दिसतो. यापासून बचावासाठी आता वयोगट क्रिकेट स्पर्धांमध्ये ‘बाऊंसर’ चेंडू टाकण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी तज्ञांद्वारे केली जात आहे. विशेष म्हणजे क्रिकेटचे नियमन करणाऱ्या एमसीसीने देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा सुरू केली आहे.
कन्कशन अत्यंत धोकादायक आहे
डोक्याच्या दुखापतीशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेचे माध्यम संचालक मायकेल टर्नर यांनी ब्रिटिश वृत्तपत्र ‘द टेलीग्राफ’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,
“जेव्हा तुम्ही किशोर ते प्रौढ असा प्रवास करत असता तेव्हा तुमचा मेंदूही विकसित होत असतो. त्यामुळे अशाप्रकारच्या दुखापतींपासून वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. आपणास कोणत्याही वयात कन्कशन टाळायचे असतेच, परंतु तरूणांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे.”
नियमांमध्ये व्हावा बदल
आपल्या मुलाखतीत टर्नर पुढे म्हणाले, “या वयोगटातील (किशोरवयीन) खेळाडूंना धोक्यात येण्यापासून वाचवण्यासाठी, नियमांमध्ये काहीसा बदल केला पाहिजे. मला वाटते या प्रकरणाचा जरा गांभीर्याने विचार करायला हवा. हेल्मेट फक्त फ्रॅक्चरपासून संरक्षण करते, कन्कशनपासून नाही. हेल्मेट हे डोक्याचे फ्रॅक्चर रोखण्यासाठी डिझाइन केले आहे. हेल्मेटमुळे कन्कशन टाळता येणार नाही. माझे वैयक्तिक मत आहे की नियमांमध्ये नक्कीच बदल करण्यात यावा.”
टर्नर यांनी डोक्याच्या दुखापतीच्या परिणामाविषयी सांगताना म्हटले, “ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. खेळाडूंच्या शरीरासोबतच त्यांच्या मनावर या गोष्टीचा मोठा परिणाम होतो. प्रौढ खेळाडूंसोबत खेळण्याअगोदर किशोरवयीन खेळाडूंनी आपल्या पालकांची परवानगी घेणे आवश्यक वाटते.”
एमसीसी करतेय चर्चा
क्रिकेटची नियमावली बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने देखील टर्नर यांच्या या सूचनांवर चर्चा सुरु केली आहे. याबाबतीतील महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच येऊ शकतो. वयोगट क्रिकेट स्पर्धांमध्ये ‘बाऊंसर’ चेंडू टाकल्यावर निर्बंध लावले जाऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू फिल ह्यूज याच्या दुर्दैवी निधनानंतर विशिष्ट पद्धतीचे हेल्मेट घालणे खेळाडूंना बंधनकारक करण्यात आले आहे. तरीदेखील, अनेकदा कमी कशामुळे खेळाडू बरेच कालावधीसाठी मैदानाबाहेर गेलेले दिसून येतात.
महत्वाच्या बातम्या:
पुन्हा घुमणार सचिन..सचिनचा आवाज; सुरू होणार ही मोठी स्पर्धा
बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात
ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा