---Advertisement---

पदक निश्चित! भारताने चायनीज तैपेईचा 3-0 असा धुव्वा उडवत थॉमस कप 2026च्या सेमीफायनलमध्ये केली एंट्री

On: शनिवार, मे 2, 2026 11:13 AM
---Advertisement---

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने शुक्रवारी (१ मे) डेन्मार्कच्या हॉर्सेन्समध्ये सुरू असलेल्या थॉमस कप २०२६ स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात चायनीज तैपेईला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही आवृत्तीत पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवण्याची भारताची ही केवळ दुसरीच वेळ आहे. २०२२ मध्ये भारताने पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठली होती, तेव्हा संघाने विजेतेपद पटकावले होते.

या स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या आयुष शेट्टीने ऑल इंग्लंड चॅम्पियन तैपेईच्या लिन चुन-यी याच्यावर २१-१६, २१-१७ असा संयमी सरळ सेटमध्ये विजय मिळवत सामना आपल्या नावावर केला. त्याने दबावाखाली शांत खेळ करत आणि संपूर्ण खेळावर आपले नियंत्रण ठेवत भारताला दोन सामने बाकी असतानाच विजय मिळवून दिला. हा सामना केवळ ४८ मिनिटांमध्येच आटोपला. गेल्या महिन्यात आशियाई चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकलेल्या आयुषने सुरूवातीपासूनच शेवटपर्यंत सामन्यावर आपले वर्चस्व ठेवले.

आयुषच्या आधी लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपापले सामने जिंकत भक्कम भारताला आघाडी मिळवून दिली.

पॅरिस २०२४ च्या उपांत्य फेरीतील खेळाडू आणि बॅडमिंटन जागतिक क्रमावारीत ११ व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चाऊ टिएन-चेनवर तीन गेममध्ये धमाकेदार विजय मिळवून भारताला आघाडी मिळवून दिली. दीड तासापेक्षा कमी वेळात चाललेल्या या गेममध्ये लक्ष्यने १८-२१, २२-२०, २१-१७ असा विजय मिळवला.

पहिल्या गेममध्ये लक्ष्यने १८-१६ अशी आघाडी घेतली होती, मात्र तैपेईच्या चाऊने खेळाडूने सलग पाच पॉइंट्स जिंकत पहिला सेट आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्येही चाऊ पुढे होता, मात्र लक्ष्यने जोरदार पुनरागमन करत दोन मॅच पॉइंट्स वाचवले आणि सेट बरोबरीत आणले. लक्ष्याने तिसऱ्या सेटमध्ये तिच लय कायम राखली आणि सामना जिंकला.

यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असेल्या सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने १४ व्या स्थानावारील वांग ची-लिन आणि चिउ सियांग-चिएह यांना २३-२१, १९-२१, २१-१२ असे पराभूत केले. हा सामना एक तास १५ मिनिटे चालला.

भारताने एकतर्फी विजय मिळवत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारताने केवळ उपांत्य फेरीत प्रवेशच नाही केला, तर पदकही निश्चित केले आहे. शनिवारी (२ मे) उपांत्य फेरीत भारताचा सामना फ्रान्सशी होईल.

या स्पर्धेत भारताने २०२२मध्ये विजेतेपद मिळवले असून १९५२, १९५५ आणि १९७९ मध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. आता संघ आणखी एका ऐतिहासिक विजेतेपदाच्या प्रयत्नात असल्याने हे भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---