---Advertisement---

आयपीएल 2026 हंगामाआधी सर्व कर्णधारांची बैठक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

On: बुधवार, मार्च 25, 2026 1:16 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्याआधी आज (२५ मार्च, बुधवार) सर्व कर्णधारांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे. यामध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम आणि आचारासंहिता यांसारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ही बैठक मुंबईच्या बीसीसीआयच्या मुख्यालयात होणार आहे.

या बैठकीमध्ये बाउन्सर नियम, बॅट तपासणी, बॉल बदलणे, रिटायर्ड-आऊट यांसारख्या महत्वाच्या नियमांबाबत स्पष्टीकरण दिले जाणार आहे. या बैठकीत बीसीसीआयच्या सामनाधिकारी आणि पंच पॅनेलचे प्रमुख जवागल श्रीनाथ आणि नितीन मेनन यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम दुपारी ४.३० ते सायंकाळ ६ च्या दरम्यान नियोजित केला आहे.

“यावर्षीच्या नियमांमध्ये काही नवीन बदल नाही, मात्र काही प्रशिक्षक आणि कर्णधार नवीन असल्याने त्यांना या नियमांविषयी माहिती देणे महत्वाचे आहे”, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

या कार्यक्रमामध्ये बीसीसीआयने नुकतेच जाहीर केलेल्या नियमावलीबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक षटकात दोन बाउन्सर, दुसऱ्या डावात चेंडू बदलणे, बॅट तपासणे, क्षेत्ररक्षकाने सीमारेषेबाहेर चेंडू मारणे, मुद्दाम शॉर्ट रन घेणे, लाळेचा वापर याबाबत अधिक चर्चा केली जाणार आहे.

सप्टेंबर २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली होती, ती २०२५ च्या आयपीएल हंगामाआधी उठवण्यात आली. यामुळे या बैठकीत दहा कर्णधारांच्या परवानगीनंतर लाळेचा वापर सुरू राहणार हे महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.

कर्णधाराला नवीन चेंडू निवडण्याची परवानगी असेल तसेच दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला १० व्या षटकानंतर एकदा चेंडू बदलण्याचा पर्याय दिला आहे. संध्याकाळच्या सामन्यांवेळी दवामुळे निर्माण होणाऱ्या या आव्हानांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तो चेंडू मात्र मैदानावरील अधिकारीच निवडणार आहेत.

आयपीएल २०२६ चा हंगाम २८ मार्चपासून सुरू होत आहे. यामध्ये पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद असा रंगणार आहे. हा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---