---Advertisement---

राहुल द्रविडप्रमाणे अजिंक्य रहाणेही दुर्लक्षित; सुनील गावस्करांकडून श्रेय न मिळाल्याची खंत व्यक्त

On: मंगळवार, ऑगस्ट 4, 2026 8:50 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटचा शांत, संयमी आणि संकटमोचक फलंदाज अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणेच्या या निर्णयाने क्रिकेट जगतात एक पोकळी निर्माण झाली असली, तरी दिग्गज खेळाडू त्याच्या देदीप्यमान कारकिर्दीचा आदरपूर्वक गौरव करत आहेत. भारताचे माजी कर्णधार आणि फलंदाजीचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी आपल्या ताज्या स्तंभात अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे. गावस्करांनी ‘मिड-डे’ मधील आपल्या स्तंभात यावर सविस्तर लिहिले आहे.

“अजिंक्य रहाणेने आपल्या कारकिर्दीत जे यश मिळवले, त्याचे योग्य श्रेय त्याला कधीच मिळाले नाही,” अशा शब्दांत गावस्करांनी रहाणेबद्दलची आपली खंत व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर त्यांनी अजिंक्यची तुलना भारताचे दुसरे ‘ग्रेट’ खेळाडू राहुल द्रविड यांच्याशी केली आहे.

गावस्कर यांनी आपल्या लेखात लिहिले की, “अजिंक्यची कर्णधार म्हणून कामगिरी अत्यंत प्रभावी राहिली आहे. सहा कसोटी सामन्यांपैकी चार विजय आणि एकही पराभव नाही, हा विक्रम थक्क करणारा आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वातही भारताने काही ऐतिहासिक विजय मिळवले; पण द्रविडला ज्याप्रमाणे कर्णधार म्हणून हवे तसे श्रेय मिळाले नाही, अगदी तीच परिस्थिती रहाणेच्या बाबतीतही राहिली. त्याच्या नेतृत्वाचे जितके कौतुक व्हायला हवे होते, तितके ते कधीच झाले नाही.”, रहाणेची नेतृत्वशैली आणि शांत स्वभाव यांची तुलना गावस्करांनी थेट राहुल द्रविडशी केली आहे.

“भारतीय क्रिकेटमध्ये ही एक जुनी पद्धत आहे. संघ जिंकतो, तेव्हा सर्व श्रेय वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या फलंदाज किंवा गोलंदाजांना दिले जाते. मात्र, संघ पराभूत होतो, तेव्हा संपूर्ण खापर कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या डोक्यावर फोडले जाते.”

2020-21 ची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ‘बॉर्डर-गावस्कर’ मालिका भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय मालिका मानली जाते. ॲडलेडमधील पहिल्या कसोटीत भारत अवघ्या 36 धावांत गारद झाला होता. त्यानंतर नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी मायदेशी परतला. त्यातच संघातील प्रमुख खेळाडू एकापाठोपाठ एक दुखापतग्रस्त होत होते.

अशा कठीण प्रसंगी, आपल्या शांत आणि जिद्दी स्वभावाच्या जोरावर अजिंक्य रहाणेने या बुडणाऱ्या जहाजाची धुरा सांभाळली. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या साथीने त्याने खचलेल्या संघाला पुन्हा उभे केले.

पुढील मेलबर्न कसोटीत रहाणेने कर्णधारपदाला साजेसे शतक झळकावून भारताला मालिकेत पुनरागमन करून दिले. अखेरच्या गाबा कसोटीत नवख्या खेळाडूंच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आणि मालिका 2-1अशी जिंकून इतिहास रचला. गावस्करांच्या मते, हा भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान विजय होता.

अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर भाष्य करताना गावस्करांनी त्याच्या नम्र स्वभावाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “अजिंक्य अत्यंत अभिमानाने आणि ताठ मानेने मैदानाबाहेर पडत आहे. त्याच्या निःस्वार्थी खेळासाठी प्रत्येक क्रिकेटप्रेमी त्याचा आभारी राहील.”

“आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ज्याचा एकही शत्रू नव्हता, असा खेळाडू शोधणे कठीण आहे. माझ्या अनुभवातून सांगायचे तर जगभरात असे दहा-बारा खेळाडूच असतील. अजिंक्य रहाणे आपल्या अत्यंत नम्र स्वभावाने या यादीत आपले हक्काचे स्थान नक्कीच मिळवेल,” अशा शब्दांत गावस्करांनी आपल्या लेखाचा शेवट केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---