पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू अडचणीत आला आहे. त्याच्यावर बोर्डानेच दोन वर्षांची बंदी घातल्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने (PCB) हमजा नझर याच्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. तसेच त्याला 10 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नझरच्या प्रकरणात बोर्डाने एक चौकशी समितीही स्थापन केली. तसेच बोर्डाने एक निवेदनही जाहीर केले आहे.
PCB ने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, हमजा नझरवर दोन वर्षांसाठी सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमधून बंदी घालण्यात आली आहे. त्याला 10 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बोर्डाने एक तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. त्यामध्ये नझरला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली. संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊनच समितीने बोर्डाला त्यांचा अहवाल सादर केला. त्यानुसार बोर्डाने आपला निर्णय आज (गुरूवार, 6 ऑगस्ट) जाहीर केला.
नझरवर नेमकी बंदी का घालण्यात आली?
झाले असे की, नझरने व्हिजासाठी अर्ज करताना खोटी माहिती दिली होती, त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. अधिक चौकशी केली असता, असे उघड झाले की त्याने अर्जादरम्यान खोटी आणि अपूर्ण माहिती दिली होती. त्याचबरोबर त्यावेळी त्याने अनेक दिशाभूल करणारी विधानेही केली होती.
नझरची कामगिरी
27 वर्षीय नझरने पाकिस्तानसाठी अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. तो एक उजव्या हाताचा फलंदाज असून त्याने 16 सामन्यांमध्ये 748 धावा केल्या आहेत. तसेच 15 लिस्ट ए सामन्यात 192 धावा आणि 10 टी20 सामन्यांमध्ये 65 धावा केल्या आहेत.
राइट-आर्म ऑफब्रेक गोलंदाजी करणाऱ्या नझरने प्रथम श्रेणीमध्ये 26 विकेट्स, लिस्ट ए मध्ये 18 विकेट्स आणि टी20 मध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. (Pakistan Cricket Board handed Two-year ban on hamza nazar and also fined details)






