क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे आपण सर्वजण जाणतो. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल, हे सांगता येत नाही. कधी एखादा संघ पहिल्या डावात भलीमोठी धावसंख्या उभारतो, तर कधी विरोधी संघाला 50 धावांचाही टप्पा पार करता येत नाही. असेच काहीसे महिला बिग बॅश लीग 9 हंगामात पाहायला मिळाले आहे. चकित करणारी बाब अशी की, यावेळी संघाचा डाव 50 नाही, तर चक्क 29 धावांवर संपुष्टात आला आहे. ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात छोटी धावसंख्या ठरली.
महिला बिग बॅश लीग (Womens Big Bash League) स्पर्धेतील चौथा सामना शनिवारी (दि. 21 ऑक्टोबर) ऍडलेड स्ट्रायकर्स महिला विरुद्ध मेलबर्न स्टार्स महिला (Adelaide Strikers Women vs Melbourne Stars Women) संघात खेळला गेला. या सामन्यात मेलबर्न स्टार्स महिला (Melbourne Stars Women) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऍडलेड स्ट्रायकर्स महिला (Adelaide Strikers Women) संघाने सपशेल चुकीचा ठरवत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 177 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मेलबर्न संघाचा डाव 29 धावांवर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. अशाप्रकारे ऍडलेडने हा सामना तब्बल 148 धावांनी नावावर केला. हा महिला बिग बॅश लीग स्पर्धेच्या इतिहासातील धावांच्या हिशोबाने सर्वात मोठा विजय ठरला.
We've bowled the Stars out for the lowest total in WBBL history!!! 🤯
All out for 29 inside 10 overs. What an amazing night at KRO! #OurCityOurTeam pic.twitter.com/5ZhNQZKZDM
— Adelaide Strikers (@StrikersBBL) October 21, 2023
महिला बीबीएल (WBBL) स्पर्धेत धावांच्या हिशोबाने सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम पर्थ स्कॉर्चर्सच्या नावावर होता. त्यांनी 8व्या हंगामात मेलबर्न रेनेगेड्स संघाविरुद्ध 104 धावांनी विजय मिळवला होता. तसेच, त्याआधी स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात सिडनी सिक्सर्सने होबार्ट हरिकेन्सविरुद्ध 103 धावांनी विजय मिळवला होता.
महिला बीबीएलमध्ये धावांच्या हिशोबाने सर्वात मोठा विजय
148 धावा- ऍडलेड स्ट्रायकर्स, विरुद्ध- मेलबर्न स्टार्स, महिला बीबीएल 9
104 धावा- पर्थ स्कॉर्चर्स, विरुद्ध- मेलबर्न रेनेगेड्स, महिला बीबीएल 8
103 धावा- सिडनी सिक्सर्स, विरुद्ध- होबार्ट हरिकेन्स, महिला बीबीएल 2
सर्व फलंदाज 10 धावांच्या आत बाद
मेलबर्न संघाकडून फलंदाजी करताना एकही फलंदाज 10 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. एकटी सोफिया डंकले हिने 10 चेंडू खेळून सर्वाधिक 9 धावा केल्या. यामध्ये एका षटकाराचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त कुणीही 5 धावाही करू शकले नाही. तब्बल 5 खेळाडू हे प्रत्येकी 1 धावेवर तंबूत परतले. यामध्ये कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिचाही समावेश होता.
यावेळी ऍडलेड स्ट्रायकर्सकडून गोलंदाजी करताना मेगन शट आणि अमांडा वेलिंग्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त अनेसू मुशांग्वे आणि कर्णधार ताहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ऍडलेडसाठी केटीची सर्वोच्च खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऍडलेडकडून केटी मॅक हिने सर्वोच्च खेळी केली. तिने 50 चेंडूत तडाखेबंद 86 धावा चोपल्या. यामध्ये 14 चौकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त लॉरा वोल्वार्ड हिने 47 धावांचे योगदान दिले. तसेच, कर्णधार ताहलिया मॅकग्रा 34 धावांवर नाबाद राहिली. यावेळी मेलबर्नकडून गोलंदाजी करताना एकच गोलंदाज यशस्वी ठरली. सोफी डे हिने 4 षटके गोलंदाजी करताना 24 धावा खर्चून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (Melbourne Stars dismissed for 29 against Adelaide Strikers in a WBBL Match)
हेही वाचा-
सातवर सत्ता! एंजेलब्रेच व बीक जोडीने बदलला 48 वर्षांचा इतिहास, नेदरलँड्सचे दमदार कमबॅक
‘मी पाकिस्तान झिंदाबाद बोलणार…’, बंगळुरूत पोलीस अन् चाहत्यामध्ये राडा- व्हिडिओ तुफान व्हायरल