लंडन। भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही महिन्यात काही ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. त्यातीलच एक म्हणजे ओव्हलवर मिळवलेला विजय. सोमवारी(६ सप्टेंबर) भारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर झालेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने कसोटी मालिकेत निर्णायक २-१ अशी आघाडी घेतली.
भारतासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला, कारण तब्बल ५० वर्षांनंतर भारतीय संघाला ओव्हल स्टेडियमवर विजय मिळवण्यात यश आले. यापूर्वी १९७१ साली भारताने ओव्हलवर कसोटी विजय मिळवला होता. त्यानंतर गेल्या ५० वर्षात कधीच भारताला ओव्हलवर विजयी पताका फडकावता आली नव्हती. मात्र, आता भारताने ओव्हलवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनेही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक केले होते. ज्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
सौरव गांगुलीने ट्विट केले होते की ‘शानदार कामगिरी, कौशल्य हा फरक आहे, पण सर्वात मोठा फरत म्हणजे दबाव शोषून घेणे हा आहे. भारतीय क्रिकेट हे अन्य सर्वांपेक्षा खूप पुढे आहे.’
गांगुलीच्या या ट्विटवर वॉनने प्रतिक्रिया दिली की ‘कसोटी क्रिकेटमध्ये… पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात नाही.’ या ट्विटमधून वॉनला म्हणायचे होते की भारत सर्वांपेक्षा कसोटीत पुढे आहे, पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये नाही.
वॉन नेहमीच त्याच्या ट्विटमुळे चर्चेत असतो. त्याने यापूर्वीही अनेकदा भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत. अनेकदा त्याच्या काही ट्विटमुळे तो ट्रोलही होतो.
In Test cricket .. not White ball cricket 👍 https://t.co/t5M3HQTB1c
— Michael Vaughan (@MichaelVaughan) September 6, 2021
या सामन्यात भारताने पहिल्या डावात केवळ १९१ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा करत ९९ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार खेळ केला.
दुसऱ्या डावात भारताकडून रोहित शर्माने शतकी खेळी केली. त्याने १२७ धावा केल्या. तसेच चेतेश्वर पुजारा (६१), रिषभ पंत (५०) आणि शार्दुल ठाकूर (६०) यांनी अर्धशतकी खेळी केली. याशिवाय केएल राहुलने ४६ आणि विराट कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे भारताने ४६६ धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. त्यांचे सलामीवीर रॉरी बर्न्स(५०) आणि हसीब हमीद(६३) यांनी अर्धशतके झळकावली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कोलमडला आणि इंग्लंड संघ केवळ २१० धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या ‘तुतारी सेलिब्रेशन’वर बार्मी आर्मीची खिलाडूवृत्ती; म्हणाले, ‘बरोबरीचा खेळ राहिला, आता…’
पाचव्या कसोटी सामन्यासाठी जार्वोने केलीय अशी तयारी, म्हणतोय…
धोनीमुळे कसे बदलले आयुष्य, शार्दुल ठाकूरने केला खुलासा