सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रोज नवनवे विक्रम रचले जात आहेत. यामध्ये आता आणखी एका विक्रमाची भर पडली. ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात क्युबाच्या मिजैन लोपेझनं 130 किलो वजनाच्या फायनलमध्ये 6-0 असा विजय मिळवून इतिहास रचला. अशाप्रकारे तो ऑलिम्पिकच्या एकाच खेळ प्रकारात पाच सुवर्णपदक जिंकणारा इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच लोपेझ ऑलिम्पिकमध्ये 5 सुवर्णपदक जिंकणारा पहिला कुस्तीपटूही बनला आहे.
41 वर्षीय मिजैन लोपेझ जवळपास दोन दशकांपासून कुस्ती खेळत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये त्यानं त्याचा दीर्घकाळापासूनचा साथीदार यासमनी फर्नांडिज याचा 6-0 असा पराभव केला. या 130 किलोच्या पैलवानानं प्रतिस्पर्ध्याला मॅटवरून उचलून धोबीपछाड दिला.
विशेष म्हणजे, 36 वर्षीय फर्नांडिज देखील क्युबाचाच आहे. मात्र लोपेझमुळे त्याला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळत नव्हती. कारण लोपेझ देशाला उपलब्ध एकमेव जागेवरून हमखास पात्र ठरायचा. त्यामुळे फर्नांडिजनं 2015 पासून चिलीकडून खेळण्यास सुरुवात केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो चिलीकडून खेळण्यास उतरला होता. फर्नांडिज रौप्यपदक जिंकताच इतिहास रचला. तो चिलीकडून कुस्तीमध्ये पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
मिजैन लोपेझनं 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. यानंतर त्यानं 2012 लंडन ऑलिम्पिक, 2016 रिओ ऑलिम्पिक, 2020 टोकियो ऑलिम्पिक आणि आता 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलंय. गेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताच लोपेझ 4 ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला कुस्तीपटू बनला होता. आता त्यानं एकूण 5 ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून इतिहासात नाव कोरलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक मिजैन लोपेझच्या कारकीर्दीचं शेवटचं ऑलिम्पिक होतं. या विजयानंतर आता त्यानं कुस्तीला अलविदा केलं आहे.
हेही वाचा –
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच
2 कुस्तीपटू आणि 2 मोठे वाद; विनेश फोगट आणि निशा दहिया यांच्याकडून पदक हिसकावले?
“विनेशविरुद्ध कट रचला, यामागे सरकारचा हात”; कुटुंबीयांचा गंभीर आरोप