भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवता मानले जाते. मात्र, एकदा सचिनवर देखील क्रिकेट खेळण्यासाठी बॅन आणला गेला होता. त्यावेळी सचिनवर चेंडूशी छेडछाड करण्याचे आरोप करण्यात आले होते. यावेळी सचिन, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागसह एकूण सहा भारतीय खेळाडूंवर हा बॅन लावण्यात आला होता. परंतु, आयसीसीने सचिनवर लावलेला हा बॅन उठवला. मात्र, चाहत्यांना आजही ही घटना लक्षात आहे.
ही घटना 2001 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात घडली होती. हा सामना पोर्ट एलिजाबेथमध्ये झाला होता. सामन्यादरम्यान हरभजन सिंग याच्या गोलंदाजीवर वीरेंद्र सेहवागने जॅक कॅलिसचा झेल घेतला. त्यानंतर क्षेत्ररक्षण करणारा सेहवाग अपील करताना पंचांच्या अगदी जवळ आला होता. त्यांनंतर पंचांनी दिलेल्या निर्णयावर सेहवागने नाराजी व्यक्त केली होती. हा सेहवागच्या कसोटी कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना होता.
सचिन तेंडुलकरने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजीदरम्यान सचिन चेंडूला घासत असल्याचे पाहिले गेले होते. या सामन्यात रेफ्रींची भूमिका इंग्लंड संघाचे माजी कर्णधार माइक डेनिस पार पाडत होते. त्यांनी सचिनवर चेंडूशी छेडछाड करण्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्यासह सहा भारतीय खेळाडूंवर एका कसोटी सामन्यासाठी बॅन लावला होता. दरम्यान दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळला गेलेला हा दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.
सामन्यादरम्यान माइक डेनिस यांनी सचिनला चेंडूशी छेडछाड आणि सेहवागला पंचांच्या निर्णयाचा अनादर करण्यासाठी एका सामन्यातून बॅन करण्याची घोषणा केली. तसेच हरभजन सिंग, दीप दास गुप्ता आणि शिवसुंदर दास यांच्यावर जास्त वेळा अपील केल्यामुळे एका कसोटी सामन्याचा बॅन लावला लावला होता. त्याव्यतिरिक्त कर्णधार सौरव गांगुलींने खेळाडूंवर नियंत्रण न ठेवल्यामुळे त्याच्यावर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्याव्यतिरिक्त या सहा खेळाडूंना सामन्यासाठी मिळणाऱ्या मोबदल्यापैकी 75 टक्के रक्कम कापली गेली होती.
बीसीसीयाने या घटनेनंतर नाराजी व्यक्त केली आणि पुढच्या कसोटी सामन्यापूर्वी रेफ्री माइक डेनिस यांना हटवण्याची मागणी केली. जर आयसीसीने त्यांंना हटवले नाही, तर भारत पुढचा कसोटी सामना खेळणार नाही, असे बीसीसीआयने सांगितले होते. आयसीसीने बीसीसीआयची ही मागणी मान्य केली नव्हती. मात्र, तिसरा कसोटी सामना रद्द होण्याच्या भीतीने क्रिकेट दक्षिण अफ्रिकाने डेनिस यांना तिसऱ्या कसोटीपूर्वी रेफ्रीच्या पदावरून हटवले.
असे असले तरी, आयसीसीने हा निर्णय मान्य केला नाही. उभय संघातील तिसरा कसोटी सामना अधिकृत नसल्याचे आयसीसीने सांगितले. तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला. मात्र, हा सामना अनाधिकृत मानला गेला. त्यानंतर आयसीसीने सचिन आणि गांगुलीवरचा बॅन उठवला. मात्र, सेहवागवरचा बॅन कायम ठेवला होता.
दरम्यान, दुसऱ्या कसोटीत झालेल्या या विवादानंतर डेनिस यांनी फक्त दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात रेफ्रीची भूमिका पार पाडली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 28 कसोटी सामन्यांमध्ये चार शतक आणि 7 अर्धशतक केले 1667 धावा केल्या होत्या. तसेच 12 कसोटींमध्ये त्यांनी एक अर्धशतक देखील केले आहे. 2013 मध्ये वयाच्या 72व्या वर्षी डेनिस यांचे कँसरमुळे निधन झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
वाढदिवस विशेष- क्रिकेटर अजित आगरकर