सध्या ऑस्ट्रेलियाची टीम साउथ आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका खेळत आहे. या मालिकेचा तिसरा सामना 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार ऑलराउंडर मिचेल ओवेन दुखापतीमुळे उर्वरित T20 सामने आणि वनडे मालिकेतून बाहेर पडले आहेत. साउथ आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात त्यांच्या हेल्मेटवर एक जोरदार चेंडू लागला होता.
चेंडू लागल्यानंतर मिचेल ओवेनचा कन्कशन टेस्ट झाला आणि तेव्हा ते पास झाले होते. पण नंतर त्यांना त्रास जाणवला आणि त्यामुळं त्यांना पूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कन्कशन गाईडलाइन्सनुसार, ओवेनला 12 दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ते साउथ आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा T20 सामना आणि 3 वनडे सामने खेळू शकणार नाहीत. याचा अर्थ त्यांच्या वनडे पदार्पणासाठी अजून थोडा वेळ थांबावं लागेल.
ओवेन व्यतिरिक्त आणखी दोन खेळाडू मॅट शॉर्ट आणि लान्स मॉरिस हे देखील वनडे मालिकेतून बाहेर झाले आहेत. मॅट शॉर्ट, जे T20I आणि वनडे मालिकेचा भाग होते, त्यांना वेस्ट इंडिज दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यानंतर ते अजूनही पूर्ण फिट झालेले नाहीत. लान्स मॉरिसला पाठीच्या खालच्या भागात वेदना असल्यामुळे पुढील तपासणीसाठी ते पर्थला परतले आहेत.
अॅरॉन हार्डी आणि मॅथ्यू कुहनेमन, जे आधीपासून T20I संघात होते, आता वनडे मालिकेसाठीही संघासोबत राहतील. हार्डी अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात होता. तर कुहनेमनने मागील 3 वर्षांपासून एकही वनडे सामना खेळलेला नाही. दरम्यान, जोश इंग्लिस, जो आजारी असल्यामुळे दुसऱ्या T20I सामन्यात खेळू शकला नव्हता, तोही संघासोबतच राहणार आहे.






