भारताने मंगळवार (१६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल ३१७ धावांनी विजय मिळवला. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा ते पाठलाग करू शकले नाहीत आणि मालिकेतील पहिला पराभव इंग्लंडच्या पदरात पडला. मात्र यादरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याने सलग तीन षटकार ठोकत एका विशिष्ट विक्रमाच्या यादीत स्थान मिळवले.
मोईन अलीचा पराक्रम
इंग्लंडचा या सामन्यात पराभव झाला असला तरी अष्टपैलू मोईन अलीने दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने, १८ चेंडूत ५ षटकार व ३ चौकारांच्या सहाय्याने ४३ गावांचे स्फोटक खेळी केली. यादरम्यान त्याने अक्षर पटेलला सलग तीन सणसणीत षटकार ठोकले.
इंग्लंडसाठी कोणत्याही फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन षटकार ठोकण्याची कामगिरी प्रथमता सन १९३३ मध्ये झालेली. इंग्लंडचे दिग्गज फलंदाज सर वॉली हॅमंड यांनी सर्वप्रथम सलग तीन चेंडूंवर ३ षटकार खेचले होते. त्यानंतर, त्यांच्या या विक्रमाची बरोबरी करण्यास दुसऱ्या इंग्लिश फलंदाजाला ८४ वर्ष लागली. अष्टपैलू बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटू केशव महाराज याला २०१७ साली ओव्हलच्या मैदानावर सलग तीन षटकार मारले होते. त्यानंतर, मंगळवारी मोईन अलीने हा पराक्रम केला.
मोईन अलीसाठी संस्मरणीय राहिला हा कसोटी सामना
जवळपास दीड वर्षाच्या काळानंतर इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मोईन अलीसाठी हा सामना संस्मरणीय ठरला. या सामन्यात इंग्लंड संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी, मोईन अलीने इंग्लंडसाठी सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने दोन्ही डावात प्रत्येकी ४-४ बळी आपल्या नावे केले. सोबतच, चौथ्या डावात ४३ धावांची आक्रमक खेळी केली.
भारतीय संघाचा चेन्नई कसोटीत शानदार विजय
सलामीवीर रोहित शर्माने १६१ धावांची लाजवाब खेळी केल्याने भारतीय संघ पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर संपुष्टात आणत संघाला १९५ धावांची आघाडी मिळवून दिली. ‘लोकल बॉय’ रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात दमदार शतक करून, भारतीय संघाला सामन्यात फ्रंटफूटवर नेले. इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान दिले गेले. हे आव्हान इंग्लंड संघाला पार करता आले नाही आणि भारताने ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला. सामनावीर म्हणून दुसऱ्या डावात शतक ठोकणारा आणि सामन्यात आठ बळी मिळवणाऱ्या रविचंद्रन अश्विनची निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटजगताला सुन्न करणारी ‘ती’ घटना, जेव्हा फलंदाजी करताना अचानक झाला होता क्रिकेटरचा मृत्यू
‘कर्णधार’ कोहलीची अझरुद्दीनच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे
विराट कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीची बरोबरी, आता स्मिथचा विक्रम निशाण्यावर