क्रिकेट जगतात अनेक विक्रम बनतात. ज्यामध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक करणे असो किंवा पदार्पणाच्या सामन्यातच गोलंदाजाद्वारे हॅट्रिक विकेट घेणे असो, या विक्रमांमध्ये प्रतिभेबरोबरच नशीबाचीही साथ असणे खूप आवश्यक आहे. कोणत्याही फलंदाजासाठी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक करणे मोठी गोष्ट असते.
याव्यतिरिक्त त्या फलंदाजाने पदार्पणाच्या आणि शेवटच्या कसोटीत शतक केले, तर त्याची कारकीर्द अविस्मरणीय मानली जाते. भारतीय संघातही असा एकमेव क्रिकेटपटू राहिला आहे, जो पदार्पणाच्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शतक ठोकण्यात यशस्वी राहिला आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) आहेत. त्यांचा हा विक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे.
पदार्पणाच्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा एकमेव भारतीय खेळाडू- Mohammad Azharuddin only Indian to Score a Hunderd on Debut Test and Last Test
अझरूद्दीन यांनी १९८४-८५ साली कोलकाता येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. आपल्या कारकीर्दीच्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अझरूद्दीन यांनी कमालीची खेळी करत ३२२ चेंडूत ११० धावांची खेळी केली होती. त्यात १० चौकारांचा समावेश आहे. अझरूद्दीन यांनी पहिल्या डावात रवी शास्त्रीबरोबर (Ravi Shastri) ५व्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी केली होती. त्यांनी आपल्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत एकूण ९९ कसोटी सामने खेळले आहेत.
त्यादरम्यान त्यांनी ४५.०३ च्या सरासरीने एकूण ६२१५ धावा केल्या आहेत. त्यात २१ अर्धशतकांचा आणि २२ शतकांचा समावेश आहे. अझरूद्दीन यांनी आपला शेवटचा कसोटी सामना २००० साली बेंगळुरू येथे खेळला होता. त्यात त्यांनी दुसऱ्या डावात १०२ धावांची शतकी खेळी केली होती. तरीही त्या कसोटी सामन्यानंतर त्यांचे मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यामुळे पुन्हा कधी ते भारतीय संघाकडून खेळू शकले नाहीत. त्यांचे १०० कसोटी सामने खेळण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
अजरूद्दीन यांच्या व्यतिरिक्त जगातील ४ क्रिकेटपटूंनी केलाय असा कारनामा
रेगी डफ (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रेगी डफ (Reggie Duff) यांनी १९०२ मध्ये मेलबर्न येथे इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. त्यात त्यांनी दुसऱ्या डावात १०४ धावांची खेळी केली होती. तसेच, आपल्या कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना त्यांनी १९०५ साली द ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यात त्यांनी पहिल्या डावात १४६ धावांची खेळी केली होती.
बिल पोन्सफोर्ड (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचेच खेळाडू बिल पोन्सफोर्ड (Bill Ponsford) यांनी १९२४ साली सिडनी येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात २२८ चेंडूत ११० धावांची खेळी केली होती. तसेच, १९३४ मध्ये ओव्हल येथे पोन्सफोर्ड यांनी इंग्लंडविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यात त्यांनी पहिल्या डावात २६६ धावांची द्विशतकी खेळी केली होती.
ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांनी १९७० मध्ये पर्थ येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्यात त्यांनी पहिल्या डावात २१८ चेंडूत १०८ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच, १९८४ साली सिडनी येथे पाकिस्तानविरुद्ध आपल्या कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळताना त्यांनी पहिल्याच डावात १८२ धावांची खेळी केली होती.
ऍलिस्टर कूक (इंग्लंड)
इंग्लंड संघाचा दिग्गज खेळाडू ऍलिस्टर कूकने (Alastair Cook) २००६ साली नागपूर येथे भारताविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. त्यात त्याने दुसऱ्या डावात २४३ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी केली होती. त्याचबरोबर त्याने आपल्या शेवटचा कसोटी सामना २०१८ साली भारताविरुद्धच खेळला होता. त्यात त्याने दुसऱ्या डावात १४७ धावांची खेळी केली होती.