सनरायझर्स हैदराबाद संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने आयपीएल २०२२मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने या हंगामात सातत्याने १५० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करताना मोठ्या विकेट्सही घेतल्या आहेत. नवख्या गुजरात टायटन्स संघाच्या ५ विकेट्सचाही त्याच्या खात्यात समावेश आहे. परंतु मागील ३ सामन्यांपासून तो भेदक गोलंदाजी तर करतोय, पण त्याला विकेट घेण्यात अपयश येत आहे. ज्यामुळे त्याला टिकांचा सामना करावा लागत आहे. अशात मोहम्मद शमी याने त्याची पाठराखण केली आहे.
गुजरात संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज असलेल्या शमीने (Mohammad Shami) मलिकला (Umran Malik) पाठींबा देत म्हटले आहे की, त्याला वेगवान गोलंदाजाच्या रूपात परिपक्व बनण्यासाठी (Shami Statement About Umran Malik) अजून थोडा वेळ लागेल.
शमी म्हणाला की, “मला मान्य आहे की, त्याच्याकडे गती आहे. परंतु मी त्याचा खूप मोठा प्रशंसक नाही. मला वाटते की, जर तुम्ही १४० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करू शकता आणि चेंडूला दोन्ही बाजूंनी रिव्हर्स (स्विंग) करू शकता, तर फलंदाजाला त्रास देण्यासाठी या गोष्टी पुरेशा आहेत. मलिककडे अश्विसनीय अशी गती आहे, परंतु त्याला परिपक्व बनण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल.”
मलिकव्यतिरिक्त लखनऊ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान (Mohsin Khan) नव्या चेंडूला स्विंग करत प्रशसंकाचे लक्ष वेधत आहेत. ६ सामन्यांमध्ये १० विकेट्स घेणाऱ्या मोहसिनबद्दल शमी म्हणाला की, “मोहसिन माझ्यासोबत सराव करत असायचा. तो युवा आणि मजबूत गोलंदाज आहे. परंतु त्याला चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, जसे तुम्हाला एका गेम प्लॅनमध्ये करावे लागते. तसेच त्याला शारिरीक आणि मानसिक रूपाने अजून चांगले बनावे लागेल.”
याखेरीज शमीला गुजरात संघातील युवा वेगवान गोलंदाज यश दयालबद्दल (Yash Dayal) विचारले गेले. “गुजरातमधील वेगवान गोलंदाज दयालने ५ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेत प्रभावशाली प्रदर्शन केले आहे. दयाल अजून खूप छोटा आणि चेंडूला दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यात पटाईत आहे. मला त्याच्यासोबत गोलंदाजीवर काम करायला जास्त वेळ मिळत नाही. परंतु मी त्याला जितके पाहिले आहे, तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यात खूप हुशार आहे,” असे शमीने दयालबद्दल म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
एमएस धोनी होणार आयपीएल २०२२नंतर निवृत्त?, ‘माही’बद्दल गावसकरांचे मोठे भाष्य; वाचा काय म्हणाले
आयपीएल दणाणून सोडणारा पंजाबचा ऋषी धवन हळहळला; म्हणाला, ‘चांगली कामगिरी करूनही कुणी लक्ष देत नव्हते’
मुझसे शादी करोगे? लाईव्ह टीव्ही शोमध्ये चाहतीची क्रिकेटरला लग्नाची मागणी, उत्तर जाणून घ्या