भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या बॉर्डर- गावसकर कसोटी मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने खूप महत्त्वपूर्ण कामगिरी केली. ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या सामन्यात त्याने दुसर्या डावात 5 विकेट्स घेत सामन्याचा कायापालट केला होता. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात ऐतिहासिक विजयाची नोंद करत 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. यानंतर भारतात येताच मोहम्मद सिराजने बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केली आहे.
ऑस्ट्रेलिया दौर्यावर कसोटी मालिकेत भारताकडून मोहम्मद सर्वाधिक जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याने तीन कसोटी सामने खेळताना 13 विकेट्स घेतल्या आहेत. या 26 वर्षीय युवा खेळाडूने भारतात येताच बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केली आहे. याची माहिती त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली आहे, ज्यामध्ये त्याची महागडी बीएमडब्ल्यू गाडी दिसत आहे.
वडिलांनी रिक्षा चालवून केले होते संगोपन
ऑस्ट्रेलिया दौर्यात मोहम्मद सिराजपुढे खूप आव्हाने निर्माण झाली होती. परंतु त्या आव्हानांचा योग्य पद्धतीने सामना करून मोहम्मद सिराजने मालिकेत आपले वर्चस्व निर्माण केले. मोहम्मद सिराजने या मालिकेत वर्णद्वेषी टिकेचा सामना करावा लागला. मात्र त्यातून खचून न जाणता जिद्दीने दमदार प्रदर्शन करून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. तो आज ज्या ठिकाणी पोहचला आहे, त्यामागे त्याची मेहनत आणि दिवगंत वडिलांची जिद्द आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
एक वेळ अशी होती की, मोहम्मद सिराजचे वडील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. शूज विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने मोहम्मद सिराज अनवाणी पायांनी क्रिकेटचा सराव करत असे. अशा हलाकीच्या परिस्थितीतून पुढे जात आयपीएलद्वारे सिराजने जगाला आपली प्रतिभा दाखवली. यामुळे भारतीय संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी खुले झाले. मात्र मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेल्यावर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तरीही मोहम्मद सिराजने माघार घेतली नाही.
मोहम्मद सिराजच्या वडिलांचे स्वप्न होते की, त्याने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळावे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो ऑस्ट्रेलियात थांबला आणि आपल्या दिवंगत वडिलांच्या अपेक्षावर खरा उतरला.
ऑस्ट्रेलिया दौरा पूर्ण करून मायदेशी आल्यानंतर मोहम्मद सिराज सर्वात पहिल्यांदा स्मशानभूमीत गेला आणि आपल्या दिवंगत वडिलांच्या थडग्यावर (कब्र) पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…