बुधवार (14 एप्रिल) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला सामना अतिशय रोमांचक ठरला. बेंगलोरचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम याने हा सामना गाजवला. आता वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कर्णधार विराट कोहलीने शेवटच्या षटकांत डावखुरा फिरकीपटू अहमदला गोलंदाजी करण्याची संधी का दिली? याबाबत खुलासा केला आहे.
या सामन्यातील 17 व्या षटकात गोलंदाजी करताना अहमदने तीन गडी बाद करून सामना पलटवला. मैदानावर दोन उजव्या हाताचे फलंदाज असल्याने 17 व्या षटकांत डावखुऱ्या शाहबाजला गोलंदाजी देण्यात आली होती. 17 व्या षटकाचा प्रारंभ होण्यापूर्वी हैदराबाद संघाने तीन गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. परंतु या षटकात शाहबाजने जॉनी बेअरस्टो (12), मनीष पांडे (38) आणि अब्दुल समद (0) यांना तंबूत पाठवून हैदराबाद संघाची विजयाची दारे बंद केली.
त्यामुळे 17 व्या षटकानंतर हैदराबाद संघाची धावसंख्या 116 वर 5 बाद अशी झाली आणि अखेर हैदराबाद संघाला निर्धारित 20 षटकांत केवळ 143 धावा करता आल्या. अहमदने त्याच्या दोन षटकांत केवळ 7 धावा देऊन 3 बळी घेतले. शाहबाजशिवाय मोहम्मद सिराजनेही चांगली गोलंदाजी केली.
सामन्यानंतर बोलताना सिराज म्हणाला, “खेळपट्टी जरा हळू असल्याने त्यावर फिरकी गोलंदाजाला गोलंदाजी करण्यास सोपे जात होते. शाहबाज अहमद शिवाय आमच्याकडे वॉशिंग्टन सुंदर देखील चांगला फिरकीपटू होता. परंतु समोर खेळपट्टीवर मनीष पांडे आणि जॉनी बेयरस्टो हे उजव्या हाताचे फलंदाज असल्याने कर्णधार विराटने शाहबाजला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले.”
पहिल्या षटकात सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने गोलंदाजी करताना चेंडू फलंदाजापासून दूर ठेवून पहिल्या षटकांत एकही धाव दिली नाही. याबाबत वेगवान गोलंदाज म्हणाला, “मी नवीन चेंडूने शक्य तितकी स्विंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मला एक किंवा दोन बळी मिळाले असते. संघाला मदत झाली असती आणि विरोधी संघावरती दबाव कायम राहीला असता.”
रजत पाटीदार ऐवजी शाहबाजची निवड करण्याबाबत विचारले असता, सिराजने सांगितले की, “शहबाज अहमद आणि रजत पाटीदार दोघेही सराव सत्रात शानदार खेळी करतात. परंतु शहबाज हा अष्टपैलू खेळाडू असून त्याच्या डाव्या हाताच्या फिरकीने आम्हाला संघात अतिरिक्त पर्याय दिला आहे.”
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यांचा पुढील सामना रविवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
उमेश यादव RRला दाखवणार इंगा! नेट्समध्ये टिपला डोळ्याचे पारणे फेडणारा एकहाती झेल, बघा व्हिडिओ
कॅप्टन रिषभच्या कामगिरीवर प्रशिक्षक रिकी पाँटिंग भलतेच खुश, ‘या’ दिग्गज कर्णधारांसोबत केली तुलना