मुंबई। भारतात सध्या सुरु असलेली सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धा युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे गाजत आहे. या स्पर्धेतील बुधवारी(१३ जानेवारी) पार पडलेल्या मुंबई विरुद्ध केरळ सामन्यानंतर देखील २६ वर्षीय युवा खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन चांगलाच चर्चेत आला. त्याने या सामन्यात केवळ ३७ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. याबरोबरच त्याने काही खास विक्रमही केले.
अझरुद्दीनमुळे केरळला सामना जिंकण्यात यश –
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १९६ धावांचा डोंगर उभा करताना केरळ समोर १९७ धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने ४० आणि आदित्य तरेने ४२ धावांची खेळी केली. तर कर्णधार सुर्यकुमार यादवने ३८ धावांची खेळी केली. तसेच केरळकडून जलज सक्सेना आणि केएम असिफने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या केरळकडून सलामीवीर अझरुद्दीन आणि रॉबिन उथप्पाने पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. अझरुद्दीनने २० चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यापुढील ५० धावा करण्यासाठी त्याला केवळ १७ चेंडू लागले. त्यामुळे त्याने ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पुढे त्याने नाबाद राहात ५४ चेंडूत १३७ धावा केल्या. या खेळीत त्याने ११ षटकार आणि ९ चौकार ठोकले. त्याचबरोबर केरळने १६ षटकांच्या आतच १९७ धावांचे आव्हान २०१ धावा करत पूर्ण केले आणि सामना जिंकला.
1⃣st 💯 for a Kerala batsman in T20s 🔥
2⃣nd fastest ton in #SyedMushtaqAliT20's history 👏
3⃣rd joint-fastest T20 hundred by an Indian batsman 👌9⃣ fours, 1⃣1⃣ sixes & 1⃣3⃣7⃣* off 5⃣4⃣!
Watch Mohammed Azharuddeen's dominating hundred 🎥👇 #KERvMUM https://t.co/72DX7UDadJ pic.twitter.com/9dbAIEq4gT
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 13, 2021
अझरुद्दीनने केले विक्रम –
या खेळी दरम्यान अझरुद्दीनने काही खास विक्रम केले आहेत. तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वोच्च खेळी करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी ल्यूक राईटने नाबाद १५३ धावांची खेळी २०१४ मध्ये ससेक्सकडून एसेक्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना केली होती.
याबरोबरच ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला असून त्याने युसुफ पठाणची बरोबरी केली आहे. ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर रिषभ पंत आहे. पंतने दिल्लीकडून हिमाचल प्रदेशविरुद्ध सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत खेळतानाच सन २०१८ ला ३२ चेंडूत शतक केले होते. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने २०१७ साली श्रीलंकाविरुद्ध भारताकडून खेळताना ३५ चेंडूत शतक केले होते.
या यादीतअझरुद्दीन युसुफसह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. युसुफने २०१० ला राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध ३७ चेंडूत शतक केले होते. आता अझरुद्दीननेही ३७ चेंडूत शतक करत त्याची बरोबरी केली आहे.
तसेच अझरुद्दीनने केलेला तिसरा मोठा विक्रम म्हणजे तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मुंबईचा श्रेयस अय्यर आहे. त्याने २०१९ ला सिक्कीम विरुद्ध मुंबईकडून १४७ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर पुनित बिश्त असून त्यानेही बुधवारी सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१ मध्ये खेळताना मेघालयाकडून मिझोरमविरुद्ध १४६ धावांची खेळी केली. तर या दोघांपाठोपाठ अझरुद्दीन नाबाद १३७ धावांच्या खेळीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याने केएल राहुलच्या नाबाद १३२ धावांच्या खेळीला मागे टाकले आहे. राहुलने ही खेळी २०२० च्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना केली होती. तसेच या यादीत पाचव्या क्रमांकावर मनिष पांडे आहे. पांडेने २०१९ ला कर्नाटककडून सर्विसेस विरुद्ध नाबाद १२९ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
थोडेथोडके नाही तर तब्बल १७ षटकारांची आतषबाजी करत ‘या’ भारतीय खेळाडूने रचले वर्ल्ड रेकॉर्ड्स
ब्रिस्बेन कसोटीसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ, पुकोस्कीच्या जागेवर ‘या’ खेळाडूला संधी
दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या जागी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ‘हे’ तीन खेळाडू प्रमुख दावेदार