---Advertisement---

रोहित शर्मा म्हणतो, माझ्या षटकारांमुळे नाही तर केवळ या खेळाडूमुळे आम्ही जिंकलो

On: गुरूवार, जानेवारी 30, 2020 4:29 PM
---Advertisement---

हॅमिल्टन। काल(29 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. तसेच 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावांची गरज होती. यावेळी या दोन्ही चेंडूवर भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. तसेच त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून रोहितने या सामन्यात 65 धावांची खेळी केली होती. त्यामुळे रोहितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

पण सामन्यानंतर रोहित म्हणाला, सामन्याचा खरा हिरो हा मोहम्मद शमी आहे. कारण त्याने शेवटच्या 5 चेंडूत न्यूझीलंडला विजयासाठी 3 धावांची गरज असताना भारताला पराभूत होण्यापासून वाचवले.

रोहित म्हणाला, ‘मला वाटते मोहम्मद शमीने गोलंदाजी केलेले शेवटचे षटक महत्त्वपूर्ण होते. त्यामुळे खरतरं आम्ही जिंकलो. माझ्या 2 षटकारांमुळे नाही. ते शमीचे षटक होते जिथे आम्ही 9 धावांचे रक्षण केले. दव असताना हे सोपे नव्हते.’

‘खेळपट्टी चांगली होती आणि न्यूझीलंडचे दोन स्थिरावलेले फलंदाज मैदानात होते. एक फलंदाज(केन विलियम्सन) 95 धावांवर फलंदाजी करत होता, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा सर्वात अनुभवी खेळाडू (रॉस टेलर) होता. त्यामुळे शमीची कमाल आहे, त्याने त्या षटकात गोलंदाजी करुन संघाला पुन्हा सामन्यात आणले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये घेऊन गेला.’

या सामन्यात भारताने निर्धारित 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला 180 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती. यावेळी भारताकडून शमी गोलंदाजी करत होता.

या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरने षटकार मारला. त्याच्या पुढच्या चेंडूवर एकेरी धाव निघाली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 2 धावा 4 चेंडू असे समीकरण होते. पण याचवेळी शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत केन विलियम्सनला तिसऱ्या चेंडूवर 95 धावांवर असताना बाद केले. तर पुढच्या दोन चेंडूत 1 धाव शमीने दिली आणि शेवटच्या चेंडूवर टेलरला त्रिफळाचीत केले.

त्यामुळे न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 धावा करता आल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---