ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज दुसरा वनडे सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात खलील अहमद ऐवजी मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यातून त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो वनडे पदार्पण करणारा भारताचा 225 वा खेळाडू ठरला आहे.
याआधी त्याने भारताकडून तीन टी20 सामने खेळले आहेत. त्याने 2017 मध्ये 4 नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्ध राजकोट येथे टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने खेळलेल्या तीन आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 49.33 च्या सरासरीने 3 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. त्याने नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये हैद्राबादकडून खेळताना पंजाब विरुद्ध 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर त्याने त्याआधी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळतानाही चांगली कामगिरी केली आहे.
त्याची भारत संघाकडून मागील काही सामन्यात चांगली कामगिरी झाली आहे. त्याने ऑगस्ट 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध झालेल्या चार दिवसीय कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी केली होती.
त्याने आत्तापर्यंत 25 प्रथम श्रेणीचे सामने खेळले असून यात 20.73 च्या सरासरीने 112 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 31 अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 31 सामन्यात 22.91 च्या सरासरीने 56 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–अँडी मरे – टेनिसचा शापित शिलेदार
–दुसऱ्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–एएफसी आशियाई करंडक- भारत स्पर्धेबाहेर, बहरिन विरुद्ध थरारक सामन्यात पराभूत