न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. यासह तीन सामन्यांची मालिका २-१ च्या निकालासह संपली. या मालिकेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज मोहम्मद हफिजने विशेष कामगिरी केली. यावर्षी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. चालू वर्षात क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरूपात सर्वाधिक धावा भारतीय फलंदाज लोकेश राहुलने काढल्या होत्या. परंतु, आता हफिजने राहुलला मागे टाकत अव्वल स्थानावर कब्जा केला.
अखेरच्या सामन्यात हफिजने टाकले राहुलला मागे
यावर्षी टी२० क्रिकेटमध्ये हफिजने एकूण ४१५ धावा केल्या आहेत. तर, केएल राहुलने ४०४ धावा केल्या होत्या. हफिजने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी२० सामन्यात ४१ धावा करुन राहुलला मागे सोडले. त्याने २९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. २०२० या वर्षात टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत इंग्लंडचा डेविड मलान ३९७ धावाांसह तिसर्या क्रमांकावर आहे. या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे न्यूझीलंडचा टीम सिफर्ट (३५२) व इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो (३२९) हे आहेत.
सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही अव्वलस्थानी
तिसऱ्या टी२० सामन्यात ४१ धावांच्या खेळीदरम्यान दोन चौकार मारताना २०२० मध्ये हफिजने सर्वाधिक चौकार मारणाऱ्या डेविड मलानची बरोबरी केली. आता, मलान व हफिज या दोघांचे प्रत्येकी ५६ चौकार झाले आहेत. मलान आणि हफिज यांच्यापाठोपाठ सिफर्ट (४७), तसेच राहुल आणि बेअरस्टोने प्रत्येकी ४६ चौकार ठोकले.
षटकार मारणाऱ्या खेळाडूंत हफिज दुसऱ्या क्रमांकावर
हफिजने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात तीन षटकार मारत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंत दुसरे स्थान मिळवले. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉक २१ षटकारांसह पहिल्या स्थानी आहे. तर, हफिजने २० षटकार ठोकले. इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन व वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी १७ षटकार खेचले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– मोहम्मद रिझवानचे दमदार अर्धशतक; तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानने व्हाईटवाॅश टाळला
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– अबब! ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीनला मिळाली इतकी किंमत