नवी दिल्ली। इंग्लंड संघाने २०१२- १३मध्ये भारतात जेव्हा कसोटी मालिका २-१ च्या फरकाने जिंकली होती, तेव्हा माँटी पनेसर आणि ग्रॅमी स्वान यांचे त्या विजयात मोलाचे योगदान होते. इंग्लंड संघाने पहिला कसोटी सामना मोठ्या अंतराने गमावला होता. परंतु नंतरच्या दोन्ही कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन करत इंग्लंडने भारतीय संघाला त्यांच्याच देशात पराभूत केले होते. पुनरागमनाची सुरुवात ही दुसऱ्या कसोटी सामन्यात पनेसरला संघात सामील केल्यानंतर झाली होती. ज्याने वानखेडे स्टेडिअममध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये त्याची सर्वात मोठी विकेट ही सचिन तेंडुलकरची होती.
पनेसरने त्या आठवणींना उजाळा दिला आहे. तो म्हणाला की, ज्या चेंडूवर त्याने सचिनला त्रिफळाचीत केले होते. ते १९९३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शेन वॉर्नच्या त्या चेंडूपेक्षा अधिक चांगला होता, ज्या चेंडूवर वॉर्नने इंग्लंडच्या माइक गेटिंगला त्रिफळाचीत केले होते.
पनेसर म्हणाला, “तुम्ही चेंडू पाहा. त्यांचा बॅलेन्स शानदार होता. परंतु ते पूर्णपणे चेंडूची लेंथ आणि त्याचा फिरकीपणा ओळखू शकले नव्हते. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर त्यांना वाटले होते की ज्या गतीने मी गोलंदाजी करत आहे, त्यावरून चेंडू लेग स्टंपकडे जाईल. परंतु असे झाले नाही.”
“हा शानदार चेंडू होता. मी म्हणेल की हा चेंडू वॉर्नच्या चेंडूपेक्षा अधिक चांगला होता. जेव्हा मी सचिनला चेंडू टाकला, तेव्हा मला मी केलेल्या त्या प्रशिक्षणाची आठवण आली होती. जेव्हा मी कसोटीत गोलंदाजी केली, मला वाटले की मी खूप फीट आहे, मजबूत आहे आणि मला वाटत होते की मी फिरकी चेंडू टाकू शकतो,” असेही तो पुढे म्हणाला.
“मला आठवते की मी स्वत:ला काय म्हटले होते, की मला ऑफ स्टंपच्या वरच्या भागाला निशाना बनवायचे आहे,” असेही पनेसर म्हणाला.
पनेसरने इंग्लंड संघाकडून ५० कसोटी सामने, २६ वनडे सामने आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. त्यात त्याने कसोटीत ३४.७१ च्या सरासरीने १६७ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने ४०.८३ च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने २० च्या सरासरीने २ विकेट्स घेतल्या आहेत.