सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
याबरोबरच हा मालिका विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे. कर्णधार म्हणून विराटचा हा परदेशातील चौथा कसोटी मालिका विजय ठरला आहे. त्यामुळे त्याने भारतीय कर्णधार म्हणून परदेशात सर्वाधिक कसोटी मालिका विजय मिळवण्याच्या सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
गांगुलीनेही कर्णधार म्हणून परदेशात 4 कसोटी विजय मिळवले आहेत. यात पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. यात त्याने बांगलादेशमध्ये दोन वेळा तर पाकिस्तान आणि झिम्बाब्वेमध्ये प्रत्येकी एक वेळा मालिका विजय मिळवला आहे.
विराटने जानेवारी 2015 मध्ये भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर त्याने श्रीलंकेमध्ये दोन वेळा तर विंडीज आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी एक वेळा कसोटी मालिका विजय मिळवला आहे.
त्याचबरोबर विराट आणि गांगुली हे कसोटीमध्ये परदेशात सर्वाधिक सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहेत. या दोघांनीही परदेशात प्रत्येकी 11 कसोटी सामन्यात विजय मिळवले आहेत.
परदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे भारतीय कर्णधार –
११ विजय* – विराट कोहली
११ विजय – सौरव गांगुली
६ विजय – एमएस धोनी
५ विजय – राहुल द्रविड
३ विजय – बिशनसिंग बेदी
महत्त्वाच्या बातम्या-
–९ पैकी ८ संघाविरुद्ध विदेशात खेळलेल्या कसोटी मालिकेत भारताने मिळवला आहे विजय…
–या दिग्गजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचे नाव सन्मानाने घेतले जाणार…
–२८ आशियाई कर्णधारांना न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली