भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये चक्क दिग्गज महेंद्रसिंह धोनीची बरोबरी केली.
वास्तविक, ध्रुव जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळताना एका डावात सर्वाधिक झेल घेण्याच्या धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रविवारी (8 सप्टेंबर) बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर इंडिया ‘ए’ साठी इंडिया बी विरुद्ध खेळताना जुरेलनं दुसऱ्या डावात 7 झेल घेतले. यापूर्वी एसएस धोनीनं 2004-05 मध्ये पूर्व विभागाकडून खेळताना मध्य विभागाविरुद्ध एका डावात रेकॉर्डब्रेक 7 झेल घेतले होते. धोनीनं एका डावात यष्टिरक्षकाद्वारे सर्वाधिक झेल घेण्याचा सुनील बेंजामिनचा 30 वर्ष जुना विक्रम (6) मोडला होता.
जुरेलनं यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, मुशीर खान, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, साई किशोर आणि नवदीप सैनी यांचे झेल घेत ही कामगिरी केली. तो आता दुलीप ट्रॉफीमध्ये धोनीसह एका डावात सर्वाधिक झेल (7) घेणारा यष्टीरक्षक बनला आहे. सुनील बेंजामिननं 1973 मध्ये दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य विभागाकडून खेळताना उत्तर विभागाविरुद्ध एक डावात 6 झेल आणि एक स्टंपिंग केलं होतं.
दुलीप ट्रॉफीमध्ये यष्टिरक्षकाद्वारे एका डावात सर्वाधिक झेल
ध्रुव जुरेल (इंडिया ए) – 7 झेल, विरुद्ध इंडिया बी, 2024-25
महेंद्रसिंह धोनी (पूर्व विभाग) – 7 झेल, विरुद्ध मध्य विभाग, 2004-05
सुनील बेंजामिन (मध्य विभाग) – 6 झेल, विरुद्ध उत्तर विभाग, 1973-74
सदानंद विश्वनाथ (दक्षिण विभाग) – 6 झेल, विरुद्ध मध्य विभाग, 1980-81
हेही वाचा –
राहुलला डच्चू, पंतला संधी? बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ
करोडोंमध्ये आहे शुबमन गिलची संपत्ती! क्रिकेटशिवाय अन्यही उत्पन्नाचे स्रोत; वाढदिवशी सर्वकाही जाणून घ्या
गणपती बाप्पा मोरया! बांगलादेशच्या क्रिकेटपटूनं साजरी केली गणेश चतुर्थी, फोटो व्हायरल