मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताच्या या विजयात एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.
धोनीने आज या सामन्यात 114 चेंडूत नाबाद 87 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. त्याचबरोबर त्याला केदारने 57 चेंडूत 61 नाबाद धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी नाबाद 121 धावांची भागीदारी रचली.
धोनीचे या मालिकेतील हे तिसरे अर्धशतक होते. त्याने या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात 51 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 55 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला असून हा त्याचा वनडेतील सातवा मालिकावीर पुरस्कार ठरला आहे.
त्यामुळे तो वनडेत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे.
या यादीत 5 मालिकावीर पुरस्कारांसह कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर असून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट 3 मालिकावीर पुरस्कारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे याआधी धोनीला 2011 मध्ये वनडेत शेवटचा मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तो जवळ जवळ आठ वर्षांनी मालिकावीर पुरस्काराचा पुन्हा एकदा मानकरी ठरला आहे.
वनडेत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार मिळवणारे यष्टीरक्षक फलंदाज –
7 – एमएस धोनी
5 – कुमार संगकारा
3 – ऍडम गिलख्रिस्ट
महत्त्वाच्या बातम्या-
–ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील अशी आहे एमएस धोनीची खास कामगिरी
–एमएस धोनीच्या शानदार खेळीने रिकी पॉंटींगचाही विक्रम मोडीत
–या दिग्गजांच्या यादीत एमएस धोनीचे नाव सन्मानाने घेतले जाणार