टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी

कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट असं अनेक चाहते, क्रिकेट तज्ञ व आजी-माजी खेळाडूंचं मत आहे. अगदी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही कसोटी क्रिकेटचं आवडतं.

कसोटी क्रिकेटमध्ये एक दोन नाहीतर तब्बल ५ दिवस सगळे सत्र चांगली कामगिरी करावी लागते. कधी फलंदाजी, कधी गोलंदाजी तर कधी क्षेत्ररक्षणात तुम्हाला चांगले काम करावे लागते. ५ दिवसांतील एक छोटी चुकही भल्याभल्या संघांना महागात पडल्याचा इतिहास साक्षीदार आहे. त्याचप्रमाणे कसोटीत तुम्ही एकदा चुक केली तर ती पुन्हा सावरण्याची संधीही तुम्हाला मिळते.

अशा वेळी जर कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळाला किंवा मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळाला तर ती नक्कीच छोटी गोष्ट नसते. सामनावीर पुरस्कार मिळवला म्हणजे त्या एकट्या खेळाडूनेच चांगली कामगिरी केली असाही त्याचा अर्थ होत नाही. तर दोन्ही संघातील मिळून २२ खेळाडूंपैकी जो संपुर्ण सामन्यात कामगिरीबाबत इतरांच्या पुढे राहिला त्याला हा पुरस्कार दिला जातो. अनेक वेळा सामनावीर पुरस्काराबद्दल अनेकांचे वेगवेगळे विचारही असतात. परंतुु शेवटी पुरस्कार तर एकाच खेळाडूला द्यायचा असतो.

कसोटीत असेही बोलले जाते की गोलंदाज कसोटी सामना जिंकून देतात. जर गोलंदाजांनी विरोधी संघाच्या २० विकेट्स घेतल्याच नाहीतर सामना जिंकणार तरी कसा. म्हणूनच कसोटीत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या ५ खेळाडूंमध्ये ३ पुर्णवेळ गोलंदाज, एक अष्टपैलू तर एक पुर्णवेळ फलंदाज खेळाडू आहेत.

आज अशाच काही खेळाडूंची आपण ओळख करुन घेणार आहोत ज्यांनी संघाच्या कसोटी विजयात जबरदस्त कामगिरी केलीच शिवाय सामनावीर पुरस्कारही मिळवलाय.

५. कुमार संगकारा-

कुमार संगकारा श्रीलंकेचा माजी कर्णधार राहिला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फलंदाजाने आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. एकदा का संगकारा- जयवर्धने जोडी फलंदाजीला आली की गोलंदाजांनी फक्त चेंडू टाकत रहायचे असंच असायचं. बरं हा संगकारा  क्रिकेटच्या सर्वच प्रकारात तेवढीच अफलातून कामगिरी करायचा.

कुमार संगकाराने कसोटीत १३४ कसोटीत १६वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. त्याने खेळलेल्या १३४ कसोटीत संघ ५४वेळा विजयी देखील झाला आहे.

४. शेन वाॅर्न-

कसोटी क्रिकेटचा इतिहास काढला तर शेन वाॅर्न हे नाव कुठे ना कुठे नक्की येतं. वाॅर्नने आपल्या लेग स्पीन गोलंदाजीच्या तालावर जगभरातील भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं आहे. वाॅर्नने कसोटीत १४५ सामन्यात १७वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. १४५ पैकी तब्बल ९२ सामन्यांत वाॅर्न संघात असताना ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वाॅर्न पाॅटींगनंतर (१०८) दुसऱ्या स्थानी आहे.

३. वसिम अक्रम-

जगभरातील वेगवगान गोलंदाजांचा एकप्रकारे आदर्शच असलेला पाकिस्तानचा वसिम आक्रमही या यादीत आहे. अक्रमने पाकिस्तानकडून १९८५ ते २००२ या काळात १०४ कसोटी सामने खेळलेय. यात तब्बल १७वेळा तो सामनावीर ठरला. प्रत्येक ६व्या कसोटीत अक्रमने सामनावीर पुरस्कार घेतला आहे. अक्रम खेळलेल्या १०४ सामन्यांपैकी पाकिस्तान संघ ४१ सामने जिंकला हे विशेष.

२. मुथय्या मुरलीधरन-

भारतीय उपखंडातील हा फिरकीपटू कसोटीत ८०० विकेट घेणारा पहिला व एकमेव खेळाडू आहे. हा विक्रम भविष्यात मोडला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. १३३ सामन्यांत १९ वेळा मुरलीने कसोटीत सामनावीर पुरस्कार मिळवला. शिवाय तो संघात असताना १३३ पैकी ५४ सामन्यात लंकेने विजय मिळवला आहे.

१. जॅक कॅलिस-

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅकवेल कॅलिस या यादीत अव्वल स्थानी आहे. असं म्हणतात की कॅलिस हा सचिन-झहीरचं काॅंबिनेशन आहे. तो फलंदाजीला आला की सचिनसारखी कामगिरी करायचा तर गोलंदाजीला आला की झहीरसारखी. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ ११ नाहीतर १२ खेळाडू घेऊन खेळतो असं गमतीने म्हटलं जायचं.

१६६ कसोटी सामन्यात १३२८९ धावा व २९२ विकेट्स अशी अफलातून कारकिर्द कॅलिसची राहिली आहे. फलंदाजीतील त्यावेळच्या अनेक मोठ्या नावांमुळे जेवढा लोकप्रिय कॅलिस व्हायला हवा होता तेवढा तो नक्कीच झाली नाही. परंतु आकडे कधी खोटं बोलत नाही व इतिहास कायम आकड्यांवरच आधारित बोलला जातो.

असो. तर हा कॅलिस ज्या १६६ कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेकडून खेळला त्यात त्याने २३वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला व असे तब्बल ८२ कसोटी सामने तो खेळला ज्यात दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला. सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या पहिल्या ५ खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे ४ खेळाडू असून कॅलिस ५व्या स्थानावर आहे.

या यादीत सचिन आहे तरी कुठे?

कसोटीत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन ७व्या स्थानावर आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यांत १४वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. विशेष म्हणजे सचिन संघात असताना भारताने ७२ कसोटी सामने जिंकले आहेत. सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन ८व्या स्थानावर आहे.

सध्या खेळत असलेल्या स्टिव स्मिथने ७३ कसोटीत ११ तर विराटने ८६ कसोटीत ९ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.

असेच काही मनोरंजक लेख-

सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच

टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

४ मराठमोळे खेळाडू ज्यांनी केल्या आहेत क्रिकेटमध्ये १०हजारपेक्षा जास्त धावा

You might also like