भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका ५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सर्वांनाच कसोटी मलिकेची उत्सुकता लागली आहे. मागील अनेक दिवसांपासून या कसोटी मालिकेबद्दल भरभरुन चर्चा होत आहे. ही ४ सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेदरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड संघात सन १९३४ पासून आत्तापर्यंत १२२ सामने झाले आहेत. यामध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम सध्या ६ खेळाडूंमध्ये विभागला गेला आहे. म्हणजे भारत आणि इंग्लंड संघात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये एकूण ६ खेळाडूंनी प्रत्येकी ३ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.
या ६ खेळाडूंमध्ये जेम्स अँडरसन, ऍलिस्टर कूक, कपिल देव, विराट कोहली, अनिल कुंबळे आणि केविन पीटरसन यांचा समावेश आहे. त्यामुळे आता अगामी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेत विराटला या यादीत अन्य पाच जणांना मागे टाकण्याची संधी आहे.
जर विराटने अगामी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेत एकदा जरी सामनावीराचा पुरस्कार मिळवला तर तो भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी सामन्यांत ४ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा पहिला क्रिकेटपटू ठरेल.
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू –
३ – कपिल देव
३ – विराट कोहली
३ – अनिल कुंबळे
३. जेम्स अँडरसन
३ – ऍलिस्टर कूक
३ – केविन पीटरसन
भारत- इंग्लंड कसोटी सामन्यांचा इतिहास –
भारत आणि इंग्लंड संघात आत्तापर्यंत १२२ कसोटी सामने झाले असून त्यातील २६ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर ४७ सामन्यांत इंग्लंडने विजय मिळवला आहे. तसेच ४९ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडने यापूर्वी २०१२ ला केलेल्या भारत दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवण्याचा देखील पराक्रम केला होता. मात्र, या कामगिरीची पुनरावृत्ती त्यांना २०१६ च्या भारत दौऱ्यात जमली नव्हती.
आता अगामी कसोटी मालिकेत दोन्ही संघात रंगतदार लढत होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. कारण इंग्लंडचा संघ श्रीलंकेला श्रीलंकेत पराभूत करत भारत दौऱ्यावर आला आहे. तर भारतीय संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत नमोहरण केले आहे. त्यामुळे दोन्ही संघाकडे आत्मविश्वास भरपूर आहे. तसेच दोन्ही संघात काही प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन देखील झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विराट रचणार विक्रमांचा ढीग, भल्याभल्या दिग्गजांवर ठरणार वरचढ
तेरा वर्षात भारत-इंग्लंडचा पूर्ण संघ बदलला, तरी ‘ते’ दोन खेळाडू मात्र आजही संघात कायम